"तरही" गझल

"मायबोली" वर वैभव जोशींनी घेतलेल्या गझल कार्यशाळेतली ही माझी गझल वैभव जोशी आणि त्यांच्या टीमला अनेकानेक धन्यवाद

ऋतू येत होते, ऋतू जात होते
मनाचे परी गाव ग्रीष्मात होते

पुन्हा खेळ झाला उन्हापावसाचा
पुन्हा साठले नीर डोळ्यात होते

उसासा जरा वेस लांघून गेला
तुला वाटले जोगिया* गात होते

तशी मी कधी काय तक्रार केली
तुझ्याही कुठे काय हातात होते?

कितीदा नव्याने पुन्हा खेळ मांडू?
कशी हार प्रत्येक डावात होते?

अता स्पंदनांचे उगा दाखले का?
तसेही कुठे प्राण देहात होते?

श्यामली!!!

*"जोगीया" एक करुणरसप्रधान राग