चेहरा

मी दिव्याची वात झाले चांदण्यांची रात झाले
मी कळी, मी रानजाई मी उषेचे हास्य झाले
मोगऱ्याचा वेल दारी , गोकुळीची राधिका मी
रूप माझे कोणते सांगा खरेसे रंगवू मी?

जानकी मी देवकी मी रोप भाताचे नवे मी
संयमाचे सोसण्याचे त्यागमूर्ती रूप ते मी
रूपकांच्या ओढण्या या ओढताना चेहऱ्याशी
माणसाचा चेहरा मी सांडला सांगा कुठेशी?

--अदिती
(१०.३.२००७)