तरही गज़ल

वैभव जोशी यांनी मायबोलीवर घेतलेल्या कार्यशाळेत मी लिहीलेली गज़ल मनोगतावरच्या रसिकांसाठी ...

ऋतू येत होते, ऋतू जात होते ..
परी चांदणे तेच, स्पर्शात होते ..

कुणी मारवा गात जातो दिवाणा ..
तुझी याद येते, सुनी रात होते ..

उरी एकली मी, असूनी सवे तू ..
अशी जिंकुनीही कशी मात होते ?

मनीचे ऋतू आगळे, जाणले मी ..
सदा आठवांचीच, बरसात होते ..

कवाडे मनाची, भले बंद केली ..
अशी का कधी सोय स्वप्नात होते ?

कुणी लावते फास सहजी गळ्याला ..
असे काय एका नकारात होते ?

ऋतूंचा कशाला कुठे दाखला द्या ?
तशीही अवेळीच बरसात होते ..

कुणी एक राधा, झपाटून जावी,
असे सावळ्या काय रंगात होते ?

भले ताल बदलो, भले चाल बदलो
तरी जीवना, गीत मी गात होते ..

कुणी राज्य केले, कुणी रिक्त गेले ..
अखेरीस सारे, स्मशानात होते ..

लढे जो तमाशी लढे प्राक्तनाशी ..
' मिनू' जीत त्याचीच समरात होते ..