देवा

आमच्या वस्तीत करतो सूर्य टाळाटाळ देवा
गोठला आहे कधीपासून येथे काळ देवा

ते तुझी घेतात नावे, जाळताना-कापताना
घेतही नाही कसा कोणी तुझ्यावर आळ देवा?

पाहिले आहेस का तू राख होताना घराला?
दगडफेकीने कधी झालास का घायाळ देवा?

कोसळाया लागले आहे पुन्हा दाही दिशांनी
बांधले कंत्राटदाराने कुण्या आभाळ देवा?

झगमगाटातून अपुल्या ये जरा बाहेर बाबा
घे कधी हातात तूही नांगराचा फाळ देवा

बदलले संदर्भ सारे; बदल सारे ग्रंथ, तूही
माणसाने मांडलेले वेद आधी चाळ देवा

पायरीवर पाय तुझिया मी कधी देणार नाही
थांब गाभाऱ्यात तूही, पायरी सांभाळ देवा!

शेवटी मैत्रीत सारे जायचे विसरून देवा
मानले, मीही जरासे बोललो वंगाळ देवा

-- चित्तरंजन भट