वर्म

का नव्याने विव्हळणे हे का पुन्हा चीत्कार आहे?
या जुन्या वर्मावरी हा ओळखीचा वार आहे!

शिंग कोणी फुंकले की शोधतो मी ढाल भारी
शोभते म्यानात माझी गंजकी तलवार आहे

व्यर्थ ते झिजले महात्मे, दु:ख का संपून गेले?
हा वसा त्याचा खरा जो पीर वेडा ठार आहे

जाणतो घरच्या खुणा मी, शोधता मिळतील वाटा
मी रमावे मग इथे का? हाय हा व्यभिचार आहे!

वाहते धमन्यात जे ते साकळे डोळ्यात ज्याच्या
अर्थ शब्दांना तयाच्या, लेखणीला धार आहे!

-- पुलस्ति.