जुळवून ठेव तारा

घेऊन मेघ आता येईल धुंद वारा
मी गीत आणतो, तू जुळवून ठेव तारा...

दोघे मिठीत घेऊ हलकेच ह्या सुरांना
घेतो कुशीत अपुल्या लाटा जसा किनारा!

दारात थांबला तो आनंद भेट घेण्या-
उपऱ्याच आसवांना देऊ नकोस थारा

प्रत्येक जीवनाचा आहे मज़ा निराळा!
भिजला कधीच नाही तो सूर्यही बिचारा...

बोलू नकोस आता तू भाव अंतरीचे
ह्या लाजऱ्या फुलांनी केला मला इशारा!

सुचतील सहज ओळी, जुळतील गझल-गाणी
जन्मेल गीतपक्षी, फुलवेलही पिसारा!

- कुमार जावडेकर, मुंबई