मनाला तुझे चांदणे माळते ....

हसावे तरी ऊर दाटून येतो
रुसावे तरी एकटीने कसे?
तुझी साद नाही उरे काय मागे?
जिवाला तुझे लागलेले पिसे

तुझे भास होतात, दाटून येते,
अनामी धुके हे मला वेढते
तुझ्या पायवाटा अशी साद देती
तरी काय मागे मला ओढते ?

कळेनाच काही कशाला जगावे?
पिपासा कशाची ? कुठे जायचे?
अनंतात झाली सुरू वाट माझी
अनंताकडे का तिला न्यायचे?

तमी दाटलेल्या ध्रुवासारखी मी
तुझा चेहरा पाहते चालते
कधी मोगऱ्याची फुले आठवोनी
मनाला तुझे चांदणे माळते ....

--अदिती
(१७ मार्च २००७)
(फाल्गुन वद्य त्रयोदशी शके १९२८)