एका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: आता परत काय?

आजचा दिवसच जरा 'मनहूस' दिसतोय. सकाळी सकाळी माझी आवडती गुलाबी केसांची (केस गुलाबी नाही हो, पिन गुलाबी.) पिन तुटली. नंतर 'अनुपस्थितीत आलेल्या भ्रमणध्वनीच्या सूचनेसाठी'(याला आंग्लभाषेत 'मिस्ड कॉल ऍलर्ट' म्हणतात.) पंधरा रुपये भ्रमणध्वनीच्या शिलकीतून हकनाक कटले. 'हवादूरध्वनी' च्या ग्राहक सेवेतील महान मनुष्याने दुरुत्तरे केली. आणि सर्वात वाईट म्हणजे तीन महिन्यापूर्वी पाठवलेल्या आणि काल पाठवलेल्या अशा दोन्ही प्रोग्राममध्ये ढेकूण (बग) निघाले.

तरी मी काल विचार करतच होते. दिलेल्या वेळेच्या दोन दिवस आधी प्रोग्राम,चाचण्या(टेस्टिंग) आणि कागदोपत्री(डॉक्युमेंटेशन),आणि सुपूर्तीकरण(सबमिशन) पण पूर्ण? कही मै सपने मे तो नही? मुंग्यांनी मेरुपर्वत तर नाही ना गिळला??वडवानलाने समुद्र तर नाही ना प्यायला?? बाजारात फ्लॉवर दोन रुपये किलो तर नाही ना झाला?

मी आपल्या कुत्र्याची (कुर्त्याची हो! या आजच्या हतबल अवस्थेत थोडी शब्दांची उलटापालट होणार‌.समजून घ्या.) नसलेली कॉलर ताठ करत आसपासच्या कामं पूर्ण न झालेल्या क्षूद्र मानवांकडे अभिमानाने पाहत होते. मी 'पुढची नोकरी मायक्रोसॉफ्ट किंवा सन किंवा बोरलँडमध्ये करावी. ती मंडळी नक्की लाल पायघड्या पांघरुन आपली वाट पाहत असतील' अशी मनाला गुदगुल्या करणारी स्वप्नं बघत होते. तितक्यात ईपत्रपेटीत प्रोग्राममधल्या चुका दाखवणारा संदेश आला.

'तुझा प्रोग्राम दहा वेळा सलग वापरल्यावर त्याच्या निकालातील संख्या वाढतात' (स्वगत: अरे अजाण टेस्टर बालका, दहा महिने पैसे बँकेत ठेवल्यावर तुझे पैसे नाही का वाढत?),
'प्रोग्राममधील एकके(युनिटस) सलग तीन वेळा बदलल्यावर निकाल शून्य येतो'(स्वगतः चालायचंच! शेवटी एक ब्रह्म हे सत्य आणि बाकी जीवन, पैसा,प्रोग्राम हे सर्व मायाच आहे ना? मग या मायावी गणिताचं उत्तर शून्य आलं तर बिघडलं कुठे?) ही बारीक निरीक्षणे वाचून मी मनातल्या मनात टेस्टरला म्हटले, 'मान गये! आपकी पारखी नजर और निरमा सुपर, दोनोको.' निमूटपणे आंतरजालाची मोहवणारी खिडकी बंद करुन मी कामाला लागले.

दोन तासात बगचा फडशा पाडून टेस्टरच्या पुढे प्रोग्राम टाकून मी आनंदाने आंतरजालाची खिडकी उघडली. तितक्यात टेस्टर आला. (याला कागद घेऊन येताना पाहून हल्ली माझ्या काळजाचे ठोके (वेगळ्या अर्थाने) चुकतात!) 'आता ते सर्व नीट आहे पण चुकीचे आकडे गणिताला दिल्यावर 'चूक' असा संदेश येत नाही.'(स्वगत: नका ना रे देऊ माझ्या भोळ्या भाबड्या प्रोग्रामला चुकीचे आकडे!) अरे बापरे! हे मी काय केले? आधीचा गोंधळ बरा होता की! मी परत (नसलेला) पदर खोचून कामाला लागले. आता टेस्टरने आनंदाने कालहरणार्थ(टाइमपाससाठी) आंतरजालाची खिडकी उघडली.

अजूनही आशा आहे! शुक्रवारची संध्याकाळ आनंदाने लवकर घरी जाऊन घालवेन.. मी इ-सकाळ, वीकीपिडीया आणि जीमेलकडे भरकटणारा मेंदू परत मुसक्या बांधून प्रोग्रामकडे खेचून आणला आणि परत दिड तासात बगचा नि:पात करुन चेंडू परत टेस्टरकडे टाकला. जरा हुश्श करत बुट काढून खुर्चीवर मांडी घालते तोच तो (दुष्ट!) परत आला.
'आता ते सर्व ठिक आहे, पण मुद्रणआज्ञा(प्रिंट कमांड) दिल्यावर प्रोग्राम लटकतो आणि प्रिंट होत नाही.' (स्वगत: कदाचित या कचेरीतील आलतूफालतू कागदांचे मुद्रण करुन कागदे वाया जाऊ नयेत ही 'श्रींची इच्छा' तर नाही ना?? तितकीच समुद्रात एक ओंजळ कागदबचत!) 

आता मात्र मला जोरजोरात रडावेसे वाटत होते. यावेळी प्रोग्राममध्ये चांगल्या निबंध लिहील्यासारख्या टिप्पणी लिहील्या, प्रोग्राम लिहीताना जागी राहिले, काळजी पण घेतली, तरी हे असे का व्हावे? माझ्या (बिनडोक) मनाने चारपाच संभाव्य पर्याय माझ्यापुढे टाकले.
१. सकाळी दुचाकीपुढून मांजर आडवी गेली तेव्हा दुचाकी पाच चाकं मागे घेतली नाही!
२. रस्त्यावर उतरुन टाकलेले लिंबू ओलांडले!
३. कोणीतरी मागून हाक मारली.
४. दृष्ट लागली.
५. नविन प्रकल्प सुरु करताना संगणकापुढे नारळ फोडला नाही!
६. चाचण्या(टेस्टिंग) अमावस्येच्या दिवशी केले! 
७. माझ्या संगणकाखाली हितशत्रूंनी मंतरलेले लिंबू ठेवले आहे.
८. ए मूर्ख बावळट! कामाला लाग! काहीतरी अकलेचे तारे तोडू नकोस!
९. बिनडोक प्राणी! शेणाच्या गोवऱ्या थाप जा घरी जाऊन!

उद्विग्न मनाने मी 'लिंबू चहा' घ्यायला कॉफीयंत्राकडे गेले. 'दलाल' या पडेल चित्रपटातील 'ठहरे हुवे पानी मे ऽऽ कंकर न मार सावरी ऽऽ दिल मे हलचल सी मच जायेगी बावरी ऽऽ' हे गाणं राहून राहून आठवत होतं. (विशेष सूचना: मराठी गीतप्रेमींनी 'शांत सागरामध्ये कशास उठविलीस वादळे ऽऽ' आठवून घ्यावे आणि आंग्लभाषाप्रेमींनी 'लेट द स्लीपींग डॉग्स लाय' ही म्हण आठवून घ्यावी!) का बरं हे असं? ही 'लर्निंग फेज' कुठवर चालणार? 'अनुभवाने शहाणपण येते' म्हणावं तर दरवेळी वेगवेगळेच अनुभव. कधी जर्मन भाषेने दिलेली धोबीपछाड तर कधी कच्च्या यांत्रिकी ज्ञानाने वाढवलेल्या चुका तर कधी गणितच कच्चं. 'ढेकूणरहित' प्रोग्राम पहिल्या झटक्यात कधी बनणार? मनच लागत नाहीये. काय करावं?मला मन रमवायला सोयीचे पर्याय आठवू लागले:
१. मीताशी 'अमक्याशी तमकीचं लफडं' या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करावी.
२. टेस्टरला कॉफीतून झोपेचे औषध द्यावे!
३. संध्याकाळसाठी अर्धा किलो गवार आताच घेऊन गुप्ततेने कॉंफरन्स रुममध्ये निवडावी!
४. पळून जाऊन स्विटझरलँडला जाऊन मधमाश्या पाळाव्यात. (सोबतीला 'दिल चाहता है' मधला सैफ आहेच!)

'लिंबू चहा' चे घुटके घेऊन फाटके मोजे काढून पर्समध्ये कोंबल्यावर मनाला परत तरतरी आली. 'वेडे, प्रोग्राममधल्या बग्स पासून नोकरी बदलून किंवा गुंडाळागुंडाळी करुन पळ काढशील, जीवनातल्या 'बग्स' चं काय करणार आहेस? ही लढाई तुला लढायलाच पाहिजे, पळपुटा बाजीराव बनून नाही, तर पराक्रमी महादजी शिंदे बनून!' असा काहीसा (बळंच) उदात्त विचार करुन नव्या दमाने 'ढेकणांशी' लढाई सुरु केली!
-अनुराधा कुलकर्णी