वादळ-रेघा

काय हरवले माझे काही समजत नाही
वेचुनि झाले कणकण "ते" का गवसत नाही?

रंगामध्ये मिसळुनि आले दु:ख कुणाचे?
केविलवाणा विदुषक मज का हसवत नाही?

जगण्याचे झगडे प्राणांतिक, बघवत नाही
बघणे नुसते बघणे, असले जगवत नाही!

ओढत बसलो काठावरती वादळ-रेघा
खंत मनी - का लाट तुफानी उसळत नाही!

गर्व मलाही होता माझ्या माणुसकीचा
अभिमानाने छाती आता उसवत नाही!

-- पुलस्ति.