पेवली

(बऱ्याच वर्षांपूर्वी ही कथा ऐकली होती. प्रत्येक गावाची अशी एक कथा असतेच. मौखीक परंपरेतून या कथा येतात. त्यामुळं इथं लिहिताना काही बदल झाले आहेत. या कथेचा आरंभ आणि अंतही मला जमलेला आहे असं वाटत नाही. बराच विचार केला तरीही. त्यामुळं जसं घडलं गेल्याचं ऐकलं होतं तसंच लिहित गेलोय.)

सूर्य माथ्यावर आला तशी ती थांबली. गावातून ती निघाली तेंव्हा सूर्यानं डोकं वरही काढलेलं नव्हतं. आपण किती काळ धावत होतो आणि किती काळ चालत होतो, तेही तिला सांगता आलं नसतं. पाठीशी झोळीत एक आणि खाली हाताशी एक बछडं होतं. दोघांना सांभाळत तिची पायपीट सुरू होती. काही अंतर धावायचं आणि काही अंतर चालायचं. हाताशी असलेलं बछडं दमलं की थांबावंच लागायचं. मग ती आधी आडोसा शोधायची. गावापासून किती अंतर आपण आलो असू याचा अंदाज ती घ्यायची. स्वतः आणि ही दोन्ही बछडी सुरक्षीत ठेवण्यासाठीची ती धडपड आपल्याला पुढे नेईल की नाही याचीच तिला चिंता लागलेली असायची. मग पुन्हा समोर बछडी दिसली की तिला पुढं सरकायची आठवण यायची. डोळ्यांसमोर यायचा तो धारा हाती घेतलेला दीर. कारभारी नसता तर आपला जीव वाचला नसता याची तिला खात्री होतीच. कारभाऱ्यानंच तिला गावाबाहेर काढून दिलेलं होतं; म्हणून ती इथंपर्यंत तरी आली होती. ती धावत सुटली तशी कारभाऱ्यानं तिच्या दीराला रोखलं होतं. तरी तिला खात्री नव्हती की तो पूर्ण रोखला गेला असेल याची. पाठलाग तर होत नाही ना याची भीती मनात ठाण मांडून बसली होती. त्यामुळे भेदरलेल्या स्थितीतच तिची ही धावपळ सुरू होती. कारभाऱ्यानं तिला आदल्याच दिवशी सांगितलं होतं की, ही वेळ तिच्यावर एक-दोन दिवसात येऊ शकते. त्याचा अंदाज एका दिवसानंच चुकला होता. तो दिवस दुसराच ठरला. मग सुरू झाली ती ही पायपीट.

पेवलीनं आजुबाजूला पाहिलं. दूरपर्यंत चहूबाजूंना कोणीही दिसत नव्हतं. डावीकडं खाली खोलवर नदी दिसत होती. तिनं नदीला पुन्हा एकदा नमस्कार केला. आपली जीवनदात्रीच ती, ती मनात म्हणाली. त्या दिशेनं ती थोडी पुढं सरकली. खाली पहाडाला खोल उतार होता. काही अंतर उतरल्यावर तिनं उजवीकडं पाहिलं. बऱ्याच अंतरावर पुढं एक सपाटीची जागा दिसत होती. पेवलीनं क्षणभर विचार केला. आपल्या गावापासून ही जागा दूर आहे. शिवाय, कोणाही गावकऱ्याच्या सहज जाण्या-येण्याच्या रस्त्यावरची नाहीये. म्हणजे आपण इथे आहोत हे दिराला कळण्याची शक्यता तशी कमीच. दरम्यानच्या काळात त्याचा राग मावळला तर ठीकच.

तिनं मागं वळून पाहिलं. चढावर कोणीही दिसत नव्हतं. निश्चिंत मनानं ती आणखी पुढं सरकली. बरंच अंतर चालत गेल्यानंतर सपाटीवर ती पोचली. तिनं पुन्हा एकदा मागं वळून पाहिलं, जंगल किती चढावर आहे ते. एक टेकडी चढली की तिथं झाडोरा दिसत होता. खाली तितकंच अंतर उतरलं की नदी होती. ही जागा तिला तिचं नवं घरकूल करण्यासाठी बरी वाटली. मग तिनं ठरवलं, इथंच आता बसायचं. आपलं जे काही व्हायचं आहे ते इथंच होईल.

सुरूवात कशी करायची? पहिल्याच प्रश्नानं पेवली थोडी भांबावली. एक गोष्ट बरी होती. हाताशी असलेलं बछडं सांगितलं तर एका जागी बसू तरी शकत होतं. घर उभं करणं सोपं नव्हतंच. रोज जंगलात जायचं. लाकूड आणायचं. ते बांधायचं आणि एकेक चौकट उभी करायची. तसाच प्रश्न शेताचाही होताच. तिच्याकडं काहीच नव्हतं. कारभाऱ्यानं मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण त्याच्याकडं निरोपही कसा द्यायचा हा प्रश्न होता. पण हे सारे नंतरचे प्रश्न झाले. आत्ता पहिला प्रश्न तिला सोडवायचा होता तो रात्रीच्या आडोश्याचा.

पेवलीनं सपाटीवरच्या त्या जागेतलं एक झाड गाठलं. तिनसाचं जवान झाड होतं ते. त्याखाली तिनं हातातलं गाठोडं ठेवलं. बछड्याच्या हातात असलेली कळशी घेतली. त्याला तिथंच बसायला सांगितलं आणि ती नदीकडं निघाली. काही पावलं गेली आणि पुन्हा मागं आली. पाठीवरची झोळी तिनं काढली. बाळाला खाली जमिनीवरच झोळीचं घोंगडं टाकून निजवलं. मग पेवली पाणी घेऊन आली. तिनं दोन्ही मुलांना जेऊ घातलं. येताना आणलेली रोटी संपली होती, त्यामुळं आता तिला रात्रीची सोयही करावी लागणार होती. दोन्ही मुलांना तिनं तिथंच निजवलं आणि तिनं जंगलाचा रस्ता धरला.

जंगल असलेल्या टेकडीवर ती चढली आणि तिनं मागं वळून पाहिलं. मुलं तशीच पडलेली होती. मग ती जंगलात शिरली. मोहाला फळं होती, त्यामुळं तो प्रश्न नव्हता. काही ठिकाणी तिला कंदही मिळाले. त्याचा तिथं इतका साठा होता की तिची पुढच्या काही दिवसांची चिंता मिटणार होती. पण तिनं ठरवलं फक्त कंदांवर दिवस नाही काढायचे. काहीही करून रोटीची किंवा भाताची सोय करायचीच. तिनं मग कमरेला बांधलेला कोयता हाती घेतला. सणसणीत वाढलेलं एक सागाचं झाड बघितलं. तेवढ्यात तिला आठवण झाली आणि ती पुन्हा जंगलाच्या सीमेवर आली. बारीक नजर करून तिनं तिनसाच्या झाडाकडं पाहिलं. तिथं हालचाल होती. मुलं उठली असावीत, हे ध्यानी येऊन तिनं धाव घेतली त्या झाडाकडं.

मुलं उठली होती. मोठा कावराबावरा होऊन इकडं-तिकडं पाहू लागला होता. आई दिसत नसल्यानं रडणाऱ्या लहानग्याकडं पाहात बसण्याखेरीज काही करावं हेही त्याला सुचत नव्हतं. पेवली पोचली. तिनं लहानग्याला कुशीत घेतलं. त्याला शांत केलं.

मुलगा म्हणाला, `कुठं गेली होतीस आम्हाला सोडून?'

`सोडून नाही रे. कंद आणला. लाकूड आणायचं होतं. तेवढ्यात इथं पाहिलं, तुमची हालचाल. म्हणून धावत आले.' तिनं सांगितलं. पुढं त्याला समजावून सांगत ती म्हणाली, `मी परत जंगलात जातेय. लाकूड आज थोडं तरी आणावंच लागेल. ते आणेपर्यंत इथं याच्यावर लक्ष ठेवून बस. काही झालं तर मला हाळी दे. तो रांगत जाईल इकडं-तिकडं, फार लांब जाऊ देऊ नकोस.' त्यानं मान डोलावली तशी ती पुन्हा जंगलाच्या दिशेनं गेली.

घरासाठी लागणारे चार खांब काढेपर्यंत पेवली दमून गेली. तरीही तिनं जिद्द सोडली नाही. काही काळ थांबून आणखी दोन खांब तिनं काढलेच. सहाही खांब वाहून नेणंही सोपं नव्हतं. तिनं मग युक्ती केली. चार खांब आडवे खाली टाकले. दोन खांब हातात घेतले. आडव्या टाकलेल्या खांबांच्या दोन्ही टोकांना जोर लावत तिनं ते ढकलण्यास सुरवात केली. तिच्या लक्षात आलं की ही युक्ती काम करतीये. मग तसं रेटतच तिनं ते खांब तिनसाच्या झाडापाशी आणले.

सूर्य मावळतीकडं झुकला होता. तो मावळण्याआधीच तिला ते खांब उभे करायचे होते. तिनं मग पटापट चार खड्डे खोदले. बोटं ते कोपरा एवढे ते खोल करताना तिच्या हाताच्या बोटांची आग सुरू झाली. पण इलाज नव्हता. तिनं काम तसंच रेटलं. सूर्य मावळला तेंव्हा पेवलीनं चारही खांब उभे केले होते. एका बाजूला घोंगडीही लावलेली होती. आडोसा झाला होता. मग दोन्ही मुलांना घेऊन ती नदीवर गेली. हात स्वच्छ धुवून तिनं तिथली माती आणि झाडपाला बोटांना लावला. परत ती वर आली. मुलांना खाऊ घालून झोपवलं.

अंधार दाटू लागला तशी भीतीची एक लहर पुन्हा पेवलीच्या मनात चमकून गेली. तिला जनावरांची भीती वाटत नव्हती. ज्या अनुभवातून ती गेली होती त्यामुळं माणसांचीच भीती अधिक होती. पण आपल्याला माणसांनी मदतही केलीय हे आठवून तिनं ती भीती मागं लोटली. आता चहुकडं शांतता होती. रातकिड्यांचा आवाज होता तेवढाच.

पेवली विचार करू लागली. गेल्या काही दिवसातील घटनांचा...

*** 

पहाडात त्यावेळी घनदाट जंगल होतं. दिवसाही सूर्य दिसायचा नाही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात. ऊन्हाळ्यात पानगळ व्हायची; पण त्याही काळात झाडांच्या फांद्यांची जाळी जिथं विरळ असायची अशाच भागातून सूर्याचं दर्शन व्हायचं.

आपल्या दोन्ही कुशींना दोन नद्या घेऊन बसलेल्या त्या पहाडातील जीवन त्या काळात कसं होतं? जंगलाचं राज्य येण्याआधी ते सुखीच होतं. जे हवं ते तिथं जंगलात मिळायचं. शेतीत खूप काही पिकायचं. एकाद्या साली पाऊस कमी पडला तर शेतीचं जे नुकसान व्हायचं ते जंगल भरून काढायचं. जंगलात कंद होते, मुळं होती, मोहाची फ्ळं होती, चारोळ्या होत्या. नदी होतीच. ओहोळही होते. तिथं मासे मिळायचे. कपडे आणि मीठ, क्वचित तंबाखू याच काय त्या गोष्टी होत्या ज्यासाठी गाव सोडून बाहेर जावं लागायचं, बाजारपेठेत.

उन्हाळा आला की, जंगलात जायचं आणि मोहाची फुलं, फळं गोळा करायची हा एक नित्यक्रम असायचा. पेवली तशीच त्या दिवशी जंगलात गेली होती. ती गेली तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता. जाताना तिच्यासोबत तिच्या दोन-चार सख्याही होत्या. जंगलात शिरेपर्यंत त्या एकत्र होत्या, जंगलात शिरल्यावर आपापल्या मार्गानं त्या गेल्या. सूर्य मावळतीला लागल्या की पुन्हा त्या जंगलाच्या सीमेवर एक येणार होत्या आणि मग गावात परतणार होत्या.

पेवली असेल तिशीची. गावात तिचं कोणी नव्हतं. आई-बाप गेले त्याची आठवणही आता तिच्या मनात अगदीच पुसटशी राहिली होती. जगण्याचा साथीदार म्हणून जो निवडला होता तोही गेला होता. जीवनसाथी गेला तो अचानकच. काही कळण्याआधीच. सकाळी ओहोळावर ती गेली होती, दुपारी परतली तर शेतात तो पडलेला होता. काहीही करण्यासारखं नव्हतं शिल्लक.

त्याच्याशी संबंधीत आठवणी तिनं मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवल्या होत्या. जंगलात त्याची पहिल्यांदा तशी भेट झाली ते ठिकाण मोहाची फुलं-फळं गोळा करता-करता आलं की तो कोपरा खुला होऊन समोर यायचा. एरवी तोही तिनं बंदच करुन ठेवला होता. आत्ताही हे विचार येण्याचं कारण तेच झाड पुन्हा समोर आलं होतं. पाठीच्या झोळीत बाळ कुरकूर करू लागलं होतं. तिनं त्याला पाजायला घेतलं.

एक बरं झालं होतं, हे कोपरे बंद करून ठेवल्यानं. त्यानंच गावच्या संमतीनं जंगल काढून केलेलं घर आणि शेत, आणि दोन मुलं यांची साथ घेत बाकी जगणं तरी सुखानं सुरू होतं. शेतीची जितकी कामं करता येतात, तितकी ती करायचीच. बाकीच्या कामांसाठी मग लाहा करावा लागायचा. त्यात मग त्याचे भाऊबंद यायचे मदतीला. एका भावाचं शेत हिच्या बांधाला लागूनच होतं. पेवलीला माहिती होतं की, जमलं तर त्याला ते शेतच हवंय. पण कारभारी जोवर आपल्या बाजूला आहे तोवर त्याला फारसं काही करता येणार नाही याची खात्री असल्यानं ती तशी निर्धास्त होती. कारभाऱ्याचे हे तिच्यावर उपकारच होते.

कारभाऱ्याचे उपकार तरी किती मानायचे हाही प्रश्नच होता. आई-बाप गेल्यानंतर ती जे जगली होती ते त्याच्याच आश्रयानं. त्यानं तिला मुलगी मानायचा वगैरे प्रश्नच कधी येऊ नये, असं तिचं आणि त्याचं नातं होतं. तिचं लग्नही त्यानंच करून दिलं होतं. त्या लग्नासाठी तिला जे देज मिळालं, तेही त्यानं घेतलं नव्हतं; ते तिच्याच पदरात टाकून तो म्हणाला होता, हे तुझंच आहे.

आठवणीत हरवलेल्या पेवलीला सूर्य मावळतीकडे झुकल्याचं भानही नव्हतं. तिच्याबरोबर आलेली सीता बोलवायला आली तेंव्हाच तिला ते कळलं. ठरल्याप्रमाणे त्या मग परतल्याही. पेवलीकडं इतर कोणाहीपेक्षा मोहाचा साठा जास्त झाला होता, त्यामुळे ती खूष होती.

पण ही खुषी फार काळ टिकणारी नव्हती हे पेवली किंवा तिच्या कोणाही सखीला माहित नव्हतं. कारण गावात त्यावेळी हाहा:कार उडालेला होता. पेवली किंवा तिच्या सख्या जंगलात गेल्या तेव्हा मजेत खेळत असणारी किंवा खाली ओहोळावर डुंबत बसलेली चार मुलं थोड्या वेळानं घरी परतली तिच मुळी झाडा होत असल्याची तक्रार करत. त्यांच्या आया किंवा घरात जे कोणी असेल त्यानं मग बुडव्याचं घर गाठलं.

पेवली आणि तिच्या सख्या गावात परतल्या तोवर सारं चित्र बदललं होतं. ती चार मुलं अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेली होती आणि आणखी सहा मुलं अंथरुणावर पडलेली होती. बुडव्याचे प्रयत्न सुरू होते; पण त्याला यश येत नव्हतं. आधी तो नुसता जडी-बुटीचाच वापर करीत होता. दुसरा दिवस उजाडला तशी या आजाराची गावात साथच पसरली होती. तोवर आणखी तीन मुलं गेली होती. झाडा झालेल्या मुलांची संख्याही आता दहावर गेली होती.  

हे अरिष्ट चौथ्या दिवशी थांबलं तेंव्हा गावातील बळींची संख्या अकरा झाली होती. गेलेल्या मुलांमध्ये पेवलीचा पुतण्याही होता. अरिष्ट थांबलं होतं त्या मुलांपुरतं. पेवलीच्या शांत आयुष्यात ते वावटळ उठवून गेलं.

पाहता-पाहता गावाची नजर बदलली. पेवलीनंच त्या मुलांना काही केलं असं लोक म्हणू लागले. ती चेटूक करते असं म्हटलं जाऊ लागलं. आणि सारं गावच तिचा दुश्मन झालं. बुडव्यानं सांगितलं, `संकट संपलेलं नाही. पेवली आहे तोवर संकटं येत राहतील.' बहिष्कृत पेवलीनं कारभाऱ्याकडंच दाद मगितली होती. पण तो काही करू शकला नाही. सगळं गाव एकीकडं आणि तो एकीकडं असं झालं. त्याला आणि पेवलीलाही माहिती होतं की या हालचालींमागं पेवलीचा दीरच आहे. जमीन हेच त्याचं कारण होतं, हेही उघड होतं. पण आता पेवलीला डाकीण ठरवल्यानंतर जमीन देऊन प्रश्न सुटणार नव्हता. तिच्या जीवावरच सारं काही बेतलं होतं.

सकाळी दीर आला तेंव्हा पेवली शेतात होती. त्यानं तिच्याशी वाद उकरून काढला तो तिच्या नवऱ्याला पैसे दिले होते ते परत मागत. थोडी बोलाचाली झाली आणि कारभाऱ्याक्डं खबर गेली. तो आला. त्याला पाहून थोडा धीर आलेल्या पेवलीनं मग दीरावर सरळ आरोप केला की तिच्या जमिनीसाठी तो हे सारं नाटक करतोय.

आपलं बिंग थेट फुटल्यानं संतापून त्यानं घरी जाऊन धारा घेतला आणि तो पेवलीला मारण्याच्याच हेतूनं परतला. कारभारी मध्ये आला आणि जीव वाचवून पेवली आता इथं पोचली होती.

***

कारभाऱ्याला निरोप कसा द्यायचा याचाच विचार करत पेवली उठली तेव्हा प्रकाश पसरू लागला होता. दोन्ही मुलं अजून उठली नव्हती. सूर्य जसा वर येईल, तशी ती जागी होतील हे ध्यानी घेऊन पेवली नदीकडं गेली. आंघोळ उरकून ती बाहेर आली तेंव्हा पूर्वेच्या बाजूनं दोन माणसं येताना तिला दिसली. या निर्जन भागात कोण असावं याचा विचार करत असतानाच तिच्या लक्षात आलं की हे यात्रेचे भाविक असणार आणि क्ष्णात तिच्या डोक्यात कल्पना चमकून गेली. कारभाऱ्यासाठी त्यांच्याकडून निरोप पाठवता येऊ शकेल.

पेवली त्यांच्या दिशेनं चालू लागली. थोड्या अंतरावर ते सामोरे आले तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावरही आश्चर्य होतं. या भागात एकटीच स्त्री कशी याचं. पुढं होत त्यांच्यातल्या प्रौढानं पेवलीची चौकशी सुरू केली; बोलावं की नको असा क्षणभरच विचार करून पेवलीनं अखेर आपण गावातून का बाहेर पडलोय ते थोडक्यात सांगितलं. डाकीण हा भाग सोडून. सांगण्याखेरीज तिच्याकडं पर्यायही नव्हता. ऐकून दोघंही सुन्न झाले होते.

पेवलीनं मग त्यांना सांगितलं की ती इथं असल्याचं तिच्या गावच्या कारभाऱ्याला सांगा. दोन्ही बाजूच्या गावांची नावं देऊन तिनसाच्या झाडाची खूणही तिनं दिली.

दोन दिवसांनी कारभारी आला तेंव्हा पेवलीनं घराचा सांगाडा उभा केला होता. त्या दोन दिवसात तिनं जीवापाड कष्ट उपसले होते. नदी, जंगल अशा फेऱ्या ती करायची. मूल सांभाळण्याची चिंताही होतीच. त्या निर्जन भागात रात्री काळीज थरकापवून गेल्या होत्या. मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात दडलेली जगण्याची दुर्दम्य इच्छाच तिला धीर देऊन गेली होती.

घराचा सांगाडा उभारण्याच्या कामात तिच्या मोठ्या, पण कामासाठी चिमुरड्याच असणाऱ्या, मुलानंही हातभार लावला होता. घाराच्या त्या सांगाड्यात त्यानंच एकेक काठी रोवून भिंतही तयार केली होती. काठ्या जंगलातून पेवली घेऊन यायची. तिनं त्याला घराचं छत करण्यासाठी पानं, गवत कसं विणायचं हे शिकवलं होतं. त्यानं एकट्यानं दोन खोल्यांसाठी पुरेल असं छत केलं होतं. ते वर चढवण्यासाठी मात्र पेवलीला कोणा-ना-कोणाची मदत लागणारच होती आणि त्याचा ती विचार करत असताना कारभारी पोचला होता.

पेवलीनं केलेलं काम पाहून तोही अचंबीत झाला होता. साठीच्या त्या वृद्धाला त्या भागात वसलेल्या गावांच्या अनेक कहाण्या माहिती होत्या; डोळ्यांसमोर उभं राहू पाहणारं ते घर म्हणजेही एक गावच असेल ही कल्पना मनात येताच तोही हरकून गेला. या पोरीत निश्चितच काही आहे, असं त्याला वाटून गेलं. मनोमन त्यानं काही ठरवलं.

येताना आणलेलं दादर आणि कोद्रूचं पोतं त्यानं खाली ठेवलं. पेवलीच्या पाठीवर थाप मारत शाबासकी देत त्यानं कमरेची धोती सावरून घेतली आणि वयाला लाजवेल अशा चपळतेनं तो घराच्या सांगड्याला भिडला. काही वेळात त्यानं ते छत उभं केलं आणि पेवलीच्या घराला रुपडं आलं. समाधानानं ती घराकडं पाहू लागली.

कारभारी तिला म्हणाला, `बाये, इथं तुझ्यासोबत राहण्यासाठी मी एक-दोघांना पाठवतोय. तुझं शेत आखून घे. जंगलापर्यंतच्या सपाटीवर आणखी चार जणांची शेतं होतील. पुढं वाढ करावी लगली की जंगल काढता येईल.'

`कोणाला पाठवणार आहेस?' पेवलीनं विचारलं.

`डोंगऱ्या आणि त्याची बायको-पोरं येतील. त्यांच्या गावात नाही तरी आता शेत राहिलेलं नाहिये त्यांचं. त्याच गावातल्या वेस्ताशीही बोललोय. तोही जंगल काढण्याचाच विचार करत होता. तोही येईल. यात्रेकरूंनी निरोप दिल्यावर आधी मी त्यांनाच भेटलोय.'

पेवलीला बरं वाटलं. असं कोणी आलं तर सोबत होईलच. त्यातही डोंगऱ्याची बायको तिच्याच गावची. वेस्ता तिचा भाऊच लागत होता. म्हणजे मंडळी विश्वासाची होती. तिनं होकार भरला.

कारभारी म्हणाला, `या गावाला तुझंच नाव लागेल. तुझं मूल मोठं झालं की तोच कारभारी होईल. तोवर फारसा प्रश्न येणारच नाही कारण इथं तुम्ही फार लोकं असणारही नाही. कोणी यायला तयार असेल तर तिघं मिळून ठरवत जा.'

पेवलीनं आठ दिवसांत शेत आखून घेतलं. तिनं एकटीनंच ते काम केलं. महिन्यानं आधी वेस्ता आणि मग डोंगऱ्याही आला. तोवर पेवलीच्या घराची उभारणी झाली होती. त्या निर्जन भागात ती एकटी राहातीये आणि एकटीनंच तिनं घर उभारलंय हे पाहूनच त्यांना घाम फुटला होता. याआधी एकाही गावाच्या कहाणीत असा पराक्रम कोणी केल्याचं त्यानी ऐकलं नव्हतं. बहुतेक कहाण्यात गावांचे जनक पुरूषच होते आणि श्रेय कोणा एकालाच दिलं जात असलं तरी त्यात किमान चार-पाच जणांचा हातभार लागलेला असायचा. पेवलीच्या गावाचा आरंभ मात्र तिनं एकटीनंच केला होता.

***

एक वर्ष झालं तेंव्हा पेवली या गावात आठ घरं झाली होती. पेवलीच्या शेताचं काम लाहा करून गाव करून देऊ लागलं होतं. जंगल काही भागात काढलं गेलं होतं. आणखी तीन वर्षांनी गावाचा घेर वाढला. पेवली आली तेंव्हा जिथं जंगल होतं त्या टेकडीच्या पुढं गाव सरकला होता. तीन पाडे झाले होते. गावातून बाहेर पडल्यावर एकटीच्या बळावर एका गावाची मुहूर्तमेढ रोवण्याचं पेवलीचं कर्तृत्वच असं अचाट होतं की गावात येणारा तिच्या शब्दाबाहेर जात नव्हता. गाव गुण्या-गोविंदानं नांदू लागलं.

***

एक किंवा दोन शतकांहून अधिक काळ लोटला असेल या घटनेला. वीस वर्षांपूर्वी ते गाव तिथून उठलं, एका धरणाला जागा करून देण्यासाठी. त्यावेळी गावात चाळीस घरं होती. प्रत्येक जण पेवली, वेस्ता किंवा डोंगऱ्याशी संबंधीत होता.

प्रकल्प झाला. गाव उठलं. पेवलीची आठवणही आता त्या गावाच्या काही लोकांच्या मनात असलेल्या इतिहासातच राहिली होती.

***

आपल्या बुडालेल्या गावाची ही कहाणी सांगून तो वृद्ध डोळ्यातून पाणी काढू लागला तेंव्हा मी निशब्द झालो होतो. त्याच्यासोबत मी त्याच्या त्या मूळ गावाच्या भागात गेलो होतो. पेवलीनं केलेल्या घराची जागा मला पहायची होती म्हणून. मला दिसलं ते फक्त पाणी. पाण्याला जीवन म्हणतात हे लहानपणी शिकलेलं मला आठवलं. जीवन या शब्दाचा पेवली आणि तिच्या पेवली या गावाच्या संदर्भात काय अर्थ असावा हे तेंव्हापासून शोधतोय!

***

१. धारा: तलवारीसारखं शस्त्र. तलवारच म्हणा.

२. लाहा: सगळ्या गावानं एकत्र येऊन एकाद्याचं घर बांधायचं किंवा शेताचं काम करण्याची प्रथा. त्या बदल्यात त्या सगळ्यांना जेवण आणि ऐपतीप्रमाणे बिडी-काडी देण्याची प्रथा.

३. झाडा: अतिसार.

४. बुडवा: गावचा वैदू. हाच मंत्र-तंत्रही करतो.