पिंगा

पिश्यात पिसे बाई पिश्यात पिसे
वाटेवर घालतेय पिंगा जसे

चिंचेच्या सालीला पिंपळाचा दोर
उलट्या पावलांचा पळाला चोर
रानाच्या पल्याड अंजिरी सावल्या
चोराच्या मिशीत अल्गद मावल्या
 फेंदारल्या मिशांनी चोरटा हसे...
पिश्यात पिसे बाई पिश्यात पिसे

झाडांच्या पल्याड समिंदर खुळा
माडांच्या पोरीला घालतोय डोळा
चांदणं प्याल्या भुकावल्या लाटा
अडवल्या वेलींनी चोराच्या वाटा
काट्यांच्या जाळीत चोरटा फसे
पिश्यात पिसे बाई पिश्यात पिसे

माडांनी वाळूशी धरला फेर
लाटांनी काठाला मांडले थेर
तुफान वाऱ्याने करता स्वारी
झिंगून रंगून मातली सारी
सावळ्या रातीवर चंद्राचे ठसे
पिश्यात पिसे बाई पिश्यात पिसे....

--अदिती
(२१.३.२००७
चैत्र शुद्ध तृतीया शके १९२९)