भास
गंधाळला वारा वाहे रानोरानी
माझ्या ध्यानीमनी प्रीत तुझी
झाडाची सावली पाखरा विसावा
मनाला विसावा ध्यास तुझा
सुवर्ण क्षितीजा सागराची गाज
मनामध्ये आज लाट तुझी
तारकांच्या माळा घालुनी साजऱ्या
नभामध्ये माझ्या चांद तुझा
तसबिरीपुढे थरथरे ज्योत
होई अंगणात भास तुझा
-सोनाली जोशी