शब्दांत प्राण आले

आता कुठे जरासे माझे लिहून झाले
आता कुठे जरासे शब्दांत प्राण आले

तोडू नकोस नाती, सोडू नकोस माती
दूरस्थ दु:खितांचे सल्ले मला मिळाले

विश्वास जिंकण्याचा त्यांनी ठराव केला
जे जे म्हणाल तुम्ही ते ते करू म्हणाले

आरोप ऐकताना तो आपसूक मेला
आडून बोलणारे मारेकरी निघाले

कंपूत पांढर्‍यांच्या का एकजूट नाही?
बदके इथे उडाली, बगळे तिथे उडाले!

-नीलहंस