नियम

जीवनाचे (/लेखनाचे) नियम सारे मोडले मी
शब्द जे रिझवीत गेले, जोडले मी!

सोडुनी घरटी जुनी पक्षी उडाले...
जीर्ण वृक्षाला तरी ना सोडले मी...

राहिला आता कुठे संदर्भ त्यांचा?
धर्मग्रंथांतील दावे खोडले मी!

कळत-नकळत मी कसा बोलून गेलो!
गुपित जपलेले चुकीने फोडले मी...

यायचा समजावण्यासाठी मला तो...
बोलणे त्याचे मधे का तोडले मी?

- कुमार जावडेकर, मुंबई