निष्पर्ण

हा येतो जातो ऋतुचक्राचा फेरा
कवटाळुन जाते मला क्षणांची माला
निष्पर्ण उभा मी माळावर एकाकी
तो पहा मुक्तीचा क्षणही समीप आला

जन्म म्हणू की स्वप्न एक जे सरले?
तुटताना धागे वाटे उदासवाणे
रात्र कितीशी आता पडली मागे?
शोधात नव्या स्वप्नाच्या निघून जाणे

पल्याडचे मज साद घालते सारे
प्रस्थान ठेवण्या अधीर झाली गात्रे
निरोप द्या,माझ्यावर पडदा टाका
हा खेळ चालू दे नवीन शोधा पात्रे .....

--अदिती
(२० एप्रिल २००७,
वैशाख शुद्ध तृतीया, शके १९२९)