ज्ञाति विसर्जन

एका धरतीच्या पोटी । नाना प्राणी जन्म घेती ।
त्यात माणसावाणी खोटी जात मिळायची न्हाय ॥

बाप आभाळ आई धरती । एका रक्ताची कारटी ।
पण जातीभेद कोटी । नोंद मिळायची न्हाय ॥

दोन पाय दोन हात । एक शीर बत्तीस दात ।
एक माणसाची जात । साऱ्या जगामधी ॥

पण गोरा कुणी काळा । कुणी पिंगट पिवळा ।
दावून वर्णभेद सोळा । करती अंदाधुंदी ॥

धर्मासाठी जो तो मेला । येशू कृष्ण रसुलला ।
आम्ही करतो हल्लागुल्ला । त्यांच्या नावावरती ॥

सारं स्वार्थाचं कारण । लावती धर्माचं तोरण ।
चाले अधर्माचं रण । साऱ्या जगावरती ॥

देशादेशांतील तऱ्हा । जातिभेदाचा पसारा ।
जाती सतराशे तेरा । नाव सांगू किती ॥

भारतात नाही अंत । आणि महाराष्ट्रात ।
जसे रौरवात जंत । एकमेका डसती ॥

भडभुंजा भराडी । कैकाडी गारोडी ।
कोल्लाटी धिसाडी । खराडी कुळवाडी । सांगू किती ॥ धृ ॥

पारधी पेंढारी । गारदी भंडारी ।
खेत्री वडारी । भोरपी डोंबारी । सांगू किती....

वाघ्या मुरळी । वांझा वरळी ।
वैदु मेरळी । धोंदिया तिरळी । सांगू किती....

कांबाटी धनगर, सलाटी सनगर ।
किराठी जिनगर । तांबाठी डफगर । सांगू किती....

रानकोळी सोनकोळी । पानमाळी, वनमाळी ।
देवकोळी, तांबोळी । वासुदेव गोंधळी । सांगू किती....

गवंडी गवळी । कातकरी कांबळी । मराठी गोपाळी । नंदिवाला पांगोळी ॥
पांचकळशी पांचाळ । चौकळशी कंचार । संतोषी भावसार । रामोशी एकलार ॥

शिंपी सुतार । कुणबी कुंभार । कसाई कासार । चारणी चांभार ॥
वाघरी दसाग्री । मल्हारी आग्री । बुरूड डग्री । भिल्ल नि ठाक्री ॥

धाडी नि धाडशी । परभू पळशी । बालकसंतोषी । कुडबुड्या जोशी ॥
भावीण भामटी । वैदू वैती । पाथरवट परटी । छप्परबंद सोरटी ॥

आतोरी आगाशी । कातारी परदेशी । जोहारी मिराशी । मुक्री मोकाशी ॥
शेषांच, कर्णाचं । चंद्राचं, सुर्याचं । ग्रह आणि ताऱ्यांचं । भांडवल साऱ्यांच ॥

ब्राह्मण सोवळं । चित्पावन जावळं । काणव कोवळं । गोवर्धन भोळं ॥
अमिर कीरवित । कऱ्हाडे कायस्थ । शेणवी सारस्वत । देवरूखे देशस्थ ॥
कानफेढे धायकुडे । निकामे नायकुडे । रिकामे डोईफोडे । हाणफोडे मानमोडे ॥

अशा पूर्वजांच्या खुणा । दाखवून दीडशहाणा ।
जो तो चालतो उताणा । खाली बघायचा न्हाय ॥

दावी सिंहाचं कुळ । मारी मिशीवर पीळ ।
पण पाहून झुरळ । उभा रहायचा न्हाय ॥

आज जगाचं विज्ञान । बालचंद्र अग्निबाण ।
चंद्र सूर्याचं अंगण । करी पारायण ॥

इथं ब्राह्मणाचं ज्ञान । साधुवाण्याचं पुराण ।
ठेवी दक्षिणेवर ध्यान । सत्यनारायण ॥

ब्रह्मज्ञान नाही ज्याला । त्याच्या ब्रह्मघोटाळयाला ।
पगडी आणि उपरण्याला । ब्राह्मण म्हणू नका ॥

जोतिराया लोकमान्य । गांधी आंबेडकर धन्य ।
याचं खरं ब्रह्मज्ञान । कुणी विसरू नका ॥

भारताचा शौर्य कणा । आम्ही क्षत्रियांचा बाणा ।
दारू ताडीचा धिंगाणा । आता घाली फांकडा ।

आमचा बाप होता वीर । आम्ही क्षत्रियांची पोरं ।
रोज बघून पेपर । आधी लावतो आकडा ।

करी मात अन्यायावर । तोच क्षत्रिय वीर ।
नुसता वंशाचा जोर । कुणी दाऊ नका ॥

कोण कुणाची अवलाद । घर बसल्यांचा हा नाद ।
असा वेडा जातीभेद । आता ठेऊ नका ।

व्यापाऱ्यांनी देश खाल्ला । देशी परदेशी माला ।
सटोड्यांनी मारला डल्ला । लोक भुके मरती ॥

करून गरिबांची होळी । करती व्यापारी दिवाळी ।
आणि कबुतरांना संध्याकाळी । दाणे चारती ॥

यांच रुप इंद्राचं । पोट मोठ उंदराच ।
हे उंदिर देशाचं । वैश्य म्हणू नका ॥

अशा नामधारी जाती । या ढासळल्या भिंती ।
झाली घुबडांची वस्ती । आता ठेऊ नका ॥

सोडा धर्म जाती रण । करा देश बलवान ।
या जातीभेदानं । माझा देश मरतो ।

समाजवादी अंतरंग । हिंदवी सारंग ।
करा ऐक्य आत्मरंग । विनवणी करतो ॥

-- शाहिर आत्माराम पाटील