एक थरारक अनुभव...

३१ डिसेंबर १९९८.
वर्षाखेर साजरी करण्यासाठी आम्ही मित्र कोल्हापूर येथील मित्राकडे - पोप्याकडे - एक दिवस आधीच डेरेदाखल झालो होतो. आदल्या वर्षी ठरवल्याप्रमाणे बारावीत कसेही गुण मिळाले आणि इन्जीनिअरींगला कुठेही प्रवेश मिळाला तरी जिथे कुठेही असु तिथून कोल्हापूर गाठायचे आणि ३१ डिसेंबर शेलीब्रेट करायचा हे अगदी सगळ्या ग्रुपनेच मनावर घेतले होते!... की, याहीवेळी संकटाचा सामना एकट्याने करणे कठीण भासावे असा खेळ नियतीने मांडून ठेवला होता?

आम्हा सगळ्याच मित्रांना क्यांप, क्यांपफ़ायर या गोष्टींचे भारी वेड. त्यामुळे ३१ डिसेंबर ही तसाच साजरा करण्याचा बेत होता. शेकोटीवर पनीर टिक्का, भरीत, तंदुरी इ. शिजवायचे आणि मस्त हाणायचे या कल्पनेनं मनातल्या मनात " वा! किती दिवसांनी! की, महिन्यांनी.." असे वाटून लय भारी वाटत होते.

३१ ला दिवसभर कोल्हापूर पासून जवळच असलेले दाजीपूरचे अभयारण्य यथेच्छ भटकून आम्ही कोल्हापूरला परतलो. दाजीपूरमध्ये एकदमच समोर आलेला गव्यांचा कळप आणि तो पाहून स्वप्नीलची उडालेली घाबरगुंडी आठवून मी मनातल्या मनात खुदखुदत होतो. आता कपिलतिर्थ मार्केट मध्ये जेवणासाठी लागणारी आवश्यक सामुग्री उचलून गाठायची होती - उजळाईवाडी. उजळाईवाडीमध्ये कुठे तळ टाकायचा ते दोन महिने अगोदरच निश्चित झाले होते. अगदीच माळरान असल्यामुळे टेपरेकॉर्डर कितीही मोठ्या आवाजात लावला, मदिराप्राशन करून कितीही धिंगाणा घातला तरी कुणाला काहीच फ़रक पडणार नव्हता.

थोडया उशिराच, साधारणपणे नऊच्या दरम्यान आम्ही तंबू, सतऱंजी, गाद्या, स्टोव्ह, स्वयंपाकाचे साहित्य, मदिरा इ. सह ठरल्या जागी पोहोच..लो.. आणि हे काय...कसलासा खिळा की काय कोण जाणे टायरमध्ये घुसून गाडी पंक्चर! एव्हाना आम्ही हमरस्त्यापासून खूप आत आल्यामुळे आणि गावभाग दूर राहिल्यामुळे कोणाकडून मदतीची अपेक्षा करणे व्यर्थ होते. असो, किंबहुना आपण ठरल्या ठिकाणाच्या अगदीच जवळ आहोत आणि उद्या काय ते बघून घेता येईल असा विचार करून सगळे जण खाली उतरलो. अगदी दहाच पावले चाललो असु आणि आम्हाला दुसरा धक्का बसला...

                                                                                                       क्रमशः