एक थरारक अनुभव... (भाग दुसरा)

असो, किंबहुना आपण ठरल्या ठिकाणाच्या अगदीच जवळ आहोत आणि उद्या काय ते बघून घेता येईल असा विचार करून सगळे जण खाली उतरलो. अगदी दहाच पावले चाललो असु आणि आम्हाला दुसरा धक्का बसला...

ठरलेल्या जागेवर प्रचंड दुर्गंधी पसरली होती. जवळच असलेल्या छोट्याशा तळ्याची अवस्था तर बघवत नव्हती. काठावर एक बैल मरून पडला होता. तळ्याकाठी तंबू टाकून राहणे केवळ अशक्य वाटत होते. काय करायचं असा प्रश्न पडला. आणि इतक्यात "ट्टॉक" असा आवाज झाला. शिऱ्याला काहितरी भन्नाट आयडिया सुचलीय ह्याची सगळ्यांनाच कल्पना आली. लहानपणी टीव्हीवर 'फ़ास्टर फ़ेणे'  बघुन शिऱ्याला लागलेली सवय आजतागायत कायम होती.

"दोस्तांनो, देऊ का एक झक्कास आयडिया?" शिऱ्या म्हणाला. स्वप्नीलचे वाढलेले ठोके मलाही जाणवले. शिऱ्याची भन्नाट आयडिया आणि त्याचा ताप स्वप्नीलला कधी झाला नाही, असे एकदाही घडले नव्हते. दहावीच्या फ़क्कड निकालानंतर आमची गोव्याची ट्रीप डोळ्यासमोर आली. कमी वर्दळीच्या अंजुना की कुठल्याशा बीचवर निर्वस्त्र पहुडलेल्या गोरांगनेचा फ़ोटो काढण्याचा शिऱ्याचा यशस्वी प्रयत्न पण ते पाहुन समुद्रात पोहत असलेला आणि क्षणभरात दोन फ़ुटांपर्यंत मागे आलेला तिचा बलदंड गोरा नवरा ...आमची उडालेली त्रेधातिरपीट..आणि सगळ्यांचे ओझे खांद्यावरच्या पिशवीत घेतलेल्या स्वप्नीलने "पळु नाहीतर मरु" प्रमाणे दुसऱ्या दिशेने काढलेला पळ सगळे एखाद्या चित्रफ़ीतीप्रमाणे झर्रकन डोळ्यासमोर तरळले.

"सांग, पण उगाच पळापळ करायला लावणारी आयडिया असेल, तर नकोच!", स्वप्नील म्हणाला. "अरे, पळापळ नाही, पण धाडसी कल्पना आहे, आणि तशी पोप्याच्या सरावाची सुद्धा आहे" इति शिऱ्या. "पोप्याच्या सरावाची? म्हणजे काय कुठे स्मशानभुमीत साजरा करायला लावतोस काय ३१ डिसेंबर?" पोप्याने स्मशानात रात्री १२ पर्यंत थांबण्याची जिंकलेली पैज आठवून मी म्हणालो. पोप्याची छाती मात्र उगाचच जरा जास्त फ़ुलली.

"नाही. तसे काही नाही." - शिऱ्या. हे ऐकून दिप्या आणि पराग़लाही हुश्श वाटले. "पण, आपले हे आत्तापर्यंतचे न भुतो असे सेलिब्रेशन असेल नक्की." सगळे प्रश्नार्थक चेहऱ्याने शिऱ्याकडे पाहु लागले. शिऱ्याची नजर एका जुनाट पडक्या वाड्यावर स्थिरावली होती. "तीन मजली वाडा... अगोदर कधी दिसला नाही तो! आपले अगोदर कसे लक्ष नाही गेले तिकडे?" - प्रत्येकाच्या मनात एकच विचार. दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीवरुन चंद्र डोकावत होता. " लय भारी, एकदम झक्कास आयडिया, यार!" पोप्या ओरडला. पोप्या जणु काही सगळ्यांच्याच मनातले बोलला होता. तळ्यापासून दूर, पण गाडीपासून जवळ असलेला तो निर्मनुष्य वाडा- मुबलक चंद्रप्रकाश असलेली दुसऱ्या मजल्यावरची गच्ची- सगळ्यांना एकदम पसंत पडली. "मान गये, शिऱ्या! पण..." स्वप्नीलच्या मनात शंकेची पाल चुरचुरली...

                                                                                             क्रमशः