ह्यासोबत
जिना प्रशस्त दिसत असला तरी मोडलेल्या पायऱ्यांवरुन वरच्या मजल्यावर जायला दिव्य करावं लागणार हे कळून चुकलं होतं. परागने पायऱ्यांवरून बॅटरीचा झोत वर सरकवला तसे आम्हां सर्वांचे लक्ष भिंतीवरल्या रोमन घड्याळाकडे गेलं. काही आकडे गायब झलेल्या त्या घड्याळाचे काटे बारावर स्थिरावले होते...
"बारा?...एवढ्यात?" कसं काय म्हणून हातातल्या घड्याळाकडे पाहिलं. माझं डिजिटल घड्याळ चक्क झोपलं होतं.
" नसतील अजून!" मनात म्हणालो आणि शिऱ्याकडे पाहिलं. शिऱ्या जिन्याच्या मध्यभागी पोचला होता आणि परागच्या हातातील बॅटरी स्वत:कडे घेत होता. "अरे, हे काय रे .ऽ.ऽ ?" "आयला, आता हिला पण इथंच पडायचं होतं?" मगाचच्या प्रयत्नात बॅटरी दोघांच्या हातातून पायरीवर पडली. शिऱ्या घ्यायला खाली वाकला तेवढ्यात ती मोडक्या पायरीवरुन खाली घरंगळली आणि... आणि सर्वत्र अंधार झाला.
"धप धप्प धप्प.." कोणीतरी जिन्यावरुन खाली उतरत असल्याचा आवाज झाला. दिप्या, स्वप्नील आणि पोप्या माझ्या पुढेच उभे होते. बहुतेक शिऱ्याच असेल...पहिल्या पायरीवरुन खाली वाकुन त्याने जिन्याच्या आतल्या बाजुला हाताने चाचपले. मीही थोडे पुढे वाकून बघण्याचा प्रयत्न करु लागलो. माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवल्याचे माझ्या लक्षातही आले नाही.
"गप यार पोप्या!" " ही काय मस्करी करायची वेळ आहे का?" पोप्यावर संशय घेत मी ओरडलो. मला कुणीतरी खाली ढकलले होते.
" हे..ऽ.ऽ..मिळाली रे मिळाली!.." शिऱ्याचा आवाज. शिऱ्याने आनंदात बॅटरी चालू केली आणि वरच्या बाजूला प्रकाशझोत टाकला. बॅटरीचा प्रकाश थेट सगळ्यात वरच्या पायरीवर उभ्या असलेल्या पोप्याच्या चेहऱ्यावर पडला. त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ स्पष्ट जाणवत होता. बॅटरी सुस्थितीत मिळाल्याच्या आनंदात हाय-फ़ाइव्ह टाइप टाळी देऊन शिऱ्या स्वप्नीलला म्हणाला, "थँक्स, आगे बढो". स्वप्नील माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहु लागला.
सगळे पुढे आणि मी सर्वात मागे असे आम्ही जिना चढू लागलो. मला राहुन राहुन सारखा एकच विचार भेडसावत होता - "स्वप्नील किंवा दिप्या माझी अशी मस्करी करणे शक्य नाही, ढकललेच असेल तर ते पोप्याने. पोप्या, दिप्या आणि स्वप्नील माझ्या पुढे उभे होते, जिन्यात परागचा बसून आणि शिऱ्याचा वाकून बॅटरीसाठी प्रयत्न चालु होता. पोप्या त्यांना त्या मोडक्या पायऱ्यांवरून ओलांडून जाणे महाकठीण होते. मग, मला ढकलून अंधारात पोप्या तिथे वर पोचलाच कसा? कि, तो अगोदरपासुनच शिऱ्याच्या पुढे चालत होता? असे असेल तर, मग, मला माझ्यापुढे दिसला तो पोप्या नव्हता?" "श्शी..काहीच कळत नाहीये", मी स्वप्नीलला झटकले, "मगाशी, तुझ्याबरोबर पोप्याच होता ना?" "नाही, रे. मी आणि दिप्या आणि तू - आपण तिघेच होतो मागे" " तो काय तो, पोप्या. शिऱ्याच्या पुढे! ते तिघे नाहीत का जिन्यावर, केंव्हापासून?" स्वप्नीलने मला आणखीच संभ्रमात टाकले. "मग, मला एवढ्या जोरात कुणी ढकलले?" "नंतर बघून घेईन"- मी स्वतःशी पुटपुटलो.
वरचा मजला एवढा प्रशस्त नाही पण भयाण वाटला. बऱ्याच जागी दगडी कोने तुटलेले दिसत होते. एक सरळ जाणारा पॅसेज आणि उजव्या बाजुने सगळ्या खोल्या अशी रचना असावी. खोल्यांच्या पॅसेजच्या बाजुला उघडणाऱ्या सगळ्याच खिडक्या बंद होत्या. काही खिडक्या तर उभ्या आडव्या सळ्या लावून बंद केलेल्या. पॅसेजच्या डाव्या बाजुला खिडकीवजा भरीव कमानी कोरल्या होत्या. कमानीवर केलेले नक्षीकाम उग्र भासत होते. त्यातल्या दोन कमानीतून बहुधा हा पॅसेज सरळ गच्चीकडे जात असावा. अंदाज घेत आम्ही पुढे चालु लागलो.
दुसऱ्या... नाही, कदाचित तिसऱ्या! तिसऱ्या खिडकीजवळ आलो असु, नसु. एवढ्यात आवाज झाला. "कर्र..र्र..क्क्ड" कुणीतरी दार उघडून पुन्हा खोली बंद केलीय, असं वाटलं. मी उगाच मागं वळून बघितलं. काहीतरी चमकल्यासारखं दिसलं. 'काजवा? इथं?' "हो, काजवाच असणार." मी मनाची समजुत घातली.
दिप्यालाही कदाचित तो दाराचा आवाज ऐकू आला असावा. त्याने स्वप्नीलची स्टिक हिसकावली आणि त्या खिडकीवर आदळली. तशी ती खिडकी सताड उघडली आणि...आणि... आणि काही सुचायच्या आत, " वच्च...व्याए.ॅ च्चॅ..ऽ.ऽ.." कसलासा विचित्र क्रूर आवाज सर्वत्र पसरला आणि मी डोळे गच्च मिटले.
क्षणार्धात समोरचे चित्र अनाकलनीय होते. पोप्या काही हातवारे करत होता, शिऱ्या बॅटरी तर दिप्या त्याच्याकडची स्टिक तलवारीसारखी फ़िरवत होता...आणि मी पुन्हा एकदा जमिनीवर आडवा झालो होतो. "स्वप्नील कुठाय?", मी जीवाच्या आकांताने ओरडलो.
क्रमशः