एक थरारक अनुभव...(भाग पाचवा)

क्षणार्धात समोरचे चित्र अनाकलनीय होते. पोप्या काही हातवारे करत होता, शिऱ्या बॅटरी तर दिप्या त्याच्याकडची स्टिक तलवारीसारखी फ़िरवत होता...आणि मी पुन्हा एकदा जमिनीवर आडवा झालो होतो. "स्वप्नील कुठाय?", मी जीवाच्या आकांताने ओरडलो.

शंभरेक वटवाघुळं त्या खिडकीतून बाहेर पडत होती. त्यांचा कर्णभेदी चित्कार असह्य होत होता. तो चिकटसर स्पर्श किळसवाणा वाटला. शिऱ्या सोडला तर दिप्या आणि परागलाही चांगलेच खरचटलं होतं. मला कानामागुन गरम वारं गेल्यासारखं वाटलं. मी किंचितशी मान तिरकी केली व उठू लागलो. आणि, कसलेसे थंड चिकट थेंब माझ्या मानेवर पडले.

 "रक्त..!" मी अक्षरशः किंचाळलो. माझा आवाज संपतो ना संपतो एवढ्यात समोरची मोठ्या पिंपाच्या आकाराची वस्तू मला हलताना दिसली. मला गरगरायला लागले होते. शिऱ्याने माझ्याकडं पाहिलं. बॅटरीचा झोत माझ्या मानेवरुन छताकडे वळवला. छताला एक वटवाघुळ चिकटलेलं होतं. दिप्याच्या स्टिकने जखमी झालं असावं, बहुधा. त्याचं गळणारं रक्त माझ्या मानेवर ओघळलं होतं. "यक.." शिऱ्याने शिसारी आल्यासारखे तोंड केलं. मी उठलो आणि रक्त पुसत पोप्याजवळ जाऊन उभा राहिलो.

पुन्हा ती पिंपासारखी दिसणारी वस्तु थरथरु लागली. " ए..म्ही...बबSभायेर य्य येउ क क्का ..." कापरा व घाबराघुबरा आवाज.  ओळखीचा तरीही अनोळखी वाटणारा. मला चक्कर येतीय असं वाटत असतानाच ते पिंप खाली पडलं आणि आतून धडपड ऐकु आली. " ए ब..बओक्SयाS.."

"आई, गं मेलो" आत जे कोणी होतं, त्याला माझं नाव ठाऊक होतं. सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळालं होतं. तरीही धाडस दाखवणं आवश्यक होतं. आडव्या पिंपाच्या पुढल्या बाजुला उभं राहुन शिऱ्यानं आणि मी झाकण बाहेर ओढायचं आणि दिप्या-पोप्यानं स्टिक आणि बॅटरी सावधपणे रोखून धोका वाटल्यास हमलाबोल करायचा, असं ठरलं.

"ह्ह... हैक" आम्ही ताकदीनं झाकण ओढलं तसा आतुन एक पांढराफ़टक हात बाहेर आला. पोप्या स्टिक हाणणार, इतक्यात, "पोप्या थांब", दिप्या किंचाळला.

"स्वप्न्या, लेका! त्यात कशाला गेलास मरायला?" मला जीवात जीव आल्यासारखं वाटलं. " ती वटवाघुळं...भ भितइ.." स्वप्नील काहीतरी बरळला. पिंपातली कसलीशी पांढरी भुकटी नाका-तोंडात गेल्यामुळे तो अगदी कासावीस झाला होता. पोप्याने त्याच्या खांद्यावरच्या पिशवीतली सोड्याची बाटली फ़ोडली. सोडा तोंडावर घेतल्यावर स्वप्नीलला जरा हुशारी आली. सगळ्यांना हायसं वाटलं. 

वटवाघळं निघुन गेली पण पोटात कावळे ओरडायला लागले होते. झपझप पावलं उचलत डाव्या बाजुअखेरच्या कमानींमधुन असलेल्या छोट्या पॅसेजमधून आम्ही सगळे एकदाचे त्या गच्चीत पोचलो. "जितम जितम जितम" आम्ही आमच्या ष्टाईलनं एकमेकांना चिअर्स केलं. सगळ्यांचा उत्साह वाढला. पण पुढे काय वाढून ठेवलंय याची कुणालाच कल्पना नव्हती...

                                                                                                 क्रमशः