दिगंत कीर्तीचे स्तंभ
ते न पेलणाऱ्या मातीचे रडे
मात्र उःषकाली अन् संध्यासमयी
नेमाने प्राजक्ताचे सडे.
अंगणात जाई, जुई अन् मोगरा
गंधाच्या साम्राज्याची सकाळ
माती उपसणाऱ्या हातांचा मात्र
सगळ्याच सौंदर्याला विटाळ.
अर्भकांची अविराम गाऱ्हाणी
जन्मवेळांचे अनुत्तरीत प्रश्न
इंद्रियांच्या अवखळ यंत्रणेला
तरीही चाळवती उन्नत वक्ष.
दर्शनाची अनित्य ओढ
मजले बांधायची नित्य खोड
सोन्याचे भंगले अवशेष
तरी कर्तृत्वाला त्याचीच जोड.
सुरुवात इथली नाही
ती तर दंडकारण्यातली
सीतेचे अजूनही सुटते भान
अन् कांचनमृगाच्या मागे मर्यादापुरुषोत्तम राम...