भाव चिंतन -३

शब्दांनो, क्षमा करा !

भावनांचे कल्लोळ जेव्हा
मनाच्या भिंतीवर खळाळू लागतात,
विचारांचे थैमान जेव्हा
मानसलहरींना धक्के देऊ लागते,
तेव्हाच आठव होतो आम्हाला तुमच्या
चिरतन दिव्यतेच्या अस्तित्वाचा....
याचना भाकत सुटतो आम्हि बापुडवाणे
तुमच्या हव्याहव्याशा सक्रीय सहभागाची...
म्हणून, शब्दांनो, क्षमा करा.... क्षमा करा!!

सोंगी ढोंगी उघडे जग जेव्हा
बोलावते आमच्या अनाहूत अंतर्वेदनांना,
उपचारांचा स्पर्श करून,
मारलेल्या मनामधून आम्ही छेडावी
अप्रीय सुरावट अशा अपेक्षेने, तेव्हाच,
सुरांच्या अवास्तव मधाळ रचनेसाठी
आम्ही घेतो धाव तुमच्याकडे....
म्हणून, शब्दांनो, क्षमा करा, क्षमा करा !!

अर्थाभिव्यक्ति... धर्मच आहे तो तुमचा
हाच अर्थ रुजवायला
व्हावे लागते तुम्हाला
आमचे बंदे गुलाम,
तेव्हाचे तुमचे केविलवाणे चेहरेमोहरे,
अस्वस्थ करतात आमची
मेलेली, मुर्दाड मने,
म्हणूनच, अगतिकपणाचे आश्रित झालेले आम्ही
विनवतो नतमस्तक होऊन...
केविलवाणे शब्दच पुन्हापुन्हा उच्चारित...
शब्दांनो, क्षमा करा...
शब्दांनो, क्षमा करा... शब्दांनो, क्षमा करा!!...

-रा. वा. गुणे.