एक दिवस...

एक दिवस असा येतो, सारा मोहराच बदलून जातो
जीवनाच्या गणिताचा, ताळमेळ चुकत जातो...१..

काय चुकले काय हुकले, मनाशी हिशोब होत असतो
कोष्टक ते ही बरोबर असता, उत्तरापर्यंत पोचत नसतो..२..

बेरीज वजाबाकी करता करता, मन सारे शिणुन जाते
गुणाकाराची संख्या घेता,भागाकारात बाकी उरते...३..

जमा खर्चाच्या ताळमेळाने, उद्विग्नता मनी येते
नैराश्येच्या काळोखाने, मन सारे भरून जाते...४..

अन अचानक एक दिवस, राहिल्या हातच्याची आठवण येते
चुकलेल्या त्या रितीची परत, सांगड जमून जाते...५...

सत्कर्माची बेरीज करता, कुकर्म त्यातुन होती वजा
छेद जाता अहंकाराचा, होतो गुणाकार विवेकाचा...६..

कोडे उलगडता जीवनाचे, मोहरा सारा बदलून जातो
नैराश्येचे मळभ जाऊन, चैतन्याचा प्रकाश मिळतो...७...

                                 - माधवी