दुसरे जगणे

पुढे पुढे चाल मुली
नको आणू डोळा पाणी
रात्र संपेल संपू दे
तुझी संपेना विराणी

दूर गेले बालपण
जरी खुणावत राही
सोसायचे सारे काही
जरा हट्ट करू नाही

तुझ्या फाटल्या आभाळा
जोड ठिगळांचा लाव
अनवाणी पावलांनी
सोड मागे हाही गाव

तुला वाटले जे तुझे,
सारे ठरले आभास
स्वप्नातल्या फुलासाठी
किती करशी हव्यास

कुठे स्नेहबंधनांची
गेली फसवी नगरी?
तुझा वनवास आहे
उभ्या जीवन संगरी

आल्या क्षणाला सोसणे
कधी शस्त्र न टाकणे
तुझ्यासाठी युद्ध आता
झाले दुसरे जगणे

-संपदा
(१६.८.२००७)