आई..!

आई किती मानू उपकार, आई किती मानू उपकार..
सुंदर जग हे पाहावयाचा, दिला मला अधिकार.....

स्तनपाने तू मज वाढविले, दुखताखुपता अतीव जपले..
बोटा धरूनी तू चालविले, पडता वारंवार...
आई किती मानू उपकार, आई किती मानू उपकार..

कुशीत तुझिया रात्री निजता, थंडी वाऱ्याची नव्हती चिंता
ममतेच्या त्या स्पर्शातूनही, बरसे अमृतधार..
आई किती मानू उपकार, आई किती मानू उपकार..

बोटा तुझीया धरूनी हाती, शाळेत मी गे झाले भरती,
शाळेच्या त्या भव्य प्रांगणी, दिला मलाच आधार..
आई किती मानू उपकार, आई किती मानू उपकार..

अल्लडपण ते सरता सरता, यौवनात त्या पाऊल पडता
भावविश्व ते माझे जपता, धैर्य तुझे अनिवार..
आई किती मानू उपकार, आई किती मानू उपकार..

बालपण ते होते मोहक, तारुण्याचा काळही मादक
दीप बनून तू माझ्या जीवनी, उजळी निरंतर वाट..
आई किती मानू उपकार, आई किती मानू उपकार..

तारुण्याच्या उंबरठ्यावरी, संस्काराची दिली शिदोरी,
त्या आधारे मार्ग चालता, सुख हो अपरंपार..
आई किती मानू उपकार, आई किती मानू उपकार..

उदासीनता कधी येता अंतरी, आठविता तव प्रेमळ मूर्ती
संयम, धीर अन मनशांती, मिळे मनाची अपार..
आई किती मानू उपकार, आई किती मानू उपकार..

फिरून जन्मा वाटे यावे, कुशीत तुझिया मिटून जावे
स्पर्श तुझ्या त्या वात्सल्याचा, मिळो पुन्हा एकवार..
आई किती मानू उपकार, आई किती मानू उपकार..

ऋण तुझे हे कधी न फिटे, त्रैलोक्याचे वैभव ही थिटे
स्वर्गसौख्यही त्याहूनी फिके, महिमा तवचि अगाध..
आई किती मानू उपकार, आई किती मानू उपकार..

सागराची ती करूनी शाई, वृक्षाची जरी केली लेखणी,
महती तुझी ही त्याहुनी मोठी, म्हणूनी नमन त्रिवार..
आई किती मानू उपकार, आई किती मानू उपकार..

- माधवी.