आताशा मी फ़क्त बकाणे चकण्याचे भरतो

चाल :

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो

प्रेरणा : मनोगत वरचे भोमेकाकांचे विडंबन

-

आताशा मी फक्त बकाणे चिवड्याचे भरतो

विषय : चावून चोथा झालेला.. म्हणजेच नवी बाटली जुना माल

:-)

तरीही विडंबन करायचे कारण : विषयाला ग्लास मास अपील आहे असे वाटले म्हणून

:-)

आताशा मी फ़क्त बकाणे चकण्याचे भरतो
प्याले भरणार्‍या वेटरला लगेच थांबवितो ||

वास नको मज कुठलाही अन भास नको आहे
बॉटल कसली मुळात मजला ग्लास नको आहे
ह्या मद्यांशी अवघ्या परवा करार मी केला
मी प्यावे ना त्यांना; त्यांनी पिऊ नये मजला
विवाहनामक बेडीमधला कैदी घाबरतो |

आता आता बाटली केवळ औषध साठवते
द्राक्षे बघता वाईन नाही, 'आसव' आठवते
आता कुठल्या दिलखुष गप्पा उनाड मित्रांशी
आता पार्टी पूर्वीगत ना रंगीत नि हौशी
उद्विगतेने दारूवरची गीते मी रचतो |

खाते जेव्हा सतत बायको नवर्‍याचा भेजा
उडून जाती स्पिरिटप्रमाणे पेल्यातिल मौजा
बारा महिने दारी श्रावण, येतो मुक्कामा
हरेक दिन मग ड्राय डे परी, सुका नि रिक्कामा
पिण्याविना मी; बिनपाण्याची मासोळी होतो

आताशा मी फ़क्त बकाणे चकण्याचे भरतो

~मिलिंद छत्रे