प्राण देही मिसळला
देह विरतो प्राणांत
अद्वैताची झाली नांदी
दोन वेगळ्या जीवांत---
धर्म काम आणि अर्थ
तीन हेच पुरुषार्थ
मर्म गृहस्थाश्रमाचे
उमगू दे तुम्हां सार्थ-----
बंधनातही जपावे
एक मोकळे आकाश
मुक्त स्वछंद फिरा हो
घ्या भरारी विनापाश----
कुणी कधी फूल होता
दुसऱ्याने व्हावे वारा
गंध न्यावा दूरवर
धुंद भवताल सारा-----
तुझे तुझे आणि माझे
नको वगळ्या शब्दांत
सारं सारं बदलू दे
एका माणूसपणात-----
एका चेतनेला जोड
दुज्या एका चैतन्याची
संसाराची सोनरेखा
पुढे पुढे रेखायची-----