तुला कशी कळणार गं
प्रीतीची गहिरी खुमारी
तू तर अल्लड छोरी॥
कुठे नजाकत अभिसाराची
संभावित अन् रातही प्यारी
तू तर अल्लड छोरी॥
अनुरागाचे नकोच बंधन
तू मुक्त पक्षिणीपरी
तू तर अल्लड छोरी॥
तरी तुझे का व्हावे बंधन
का तुझी वेदना उरी
तू तर अल्लड छोरी॥
तिरपा जरि हा कटाक्ष उडता
उरात रुतवी खोल सुरी
तू तर अल्लड छोरी॥
झांक तुझ्या डोळ्यातली
फसवी? का ती आर्त खरी
तू तर अल्लड छोरी॥
वरवर अवखळ कितितरि चंचल
दिसशी पण तू नसशी खरी
तू तर अल्लड छोरी॥
भिरभिरणारी नाजुक भिंगरी
संयमातही ताठ खडी
तू तर अल्लड छोरी॥
हुरहुरणारी यौवन ठिणगी
वणव्यालाही शांत करी
तू तर अल्लड छोरी॥