आज सहज मनोगतावरील आपले खाते उघडून पाहिले आणि अस्मादिकांच्या सदस्यत्वाचे पहिले वर्ष पूर्ण होत आल्याची जाणीव झाली. "त्यात काय मोठं आहे?" किंवा "या वर्षात असे किती दिवे लावलेत?" असे प्रश्न विचारणाऱ्या लोकांना ते खुशाल विचारू देत. एक वर्षाच्या पोराला नाक पुसण्याचीसुद्धा अक्कल आली नसली तरी काय झाले? कुशीला वळणे, पालथे पडून पुढे सरकणे, रांगणे, आधार धरून उभे राहणे असल्या क्रियांमधून त्याला जो महद आनंद मिळतो आणि कौतुकाने ते पाहणाऱ्या लोकांना जी मजा वाटते तिचे महत्त्व कांही त्यामुळे कमी होत नाही.
संगणकाद्वारे मराठी भाषेत चार अक्षरे लिहून ती आंतर्जालावर टाकणे आता कोणालाही शक्य झाले आहे हे मला जेंव्हा समजले तेंव्हा त्याचेच खूप अप्रूप वटले. त्यासाठी काय काय करावे लागते त्याची माहिती काढली आणि फेकाफेकीला सुरुवात केली. आपणसुद्धा हे करू शकतो याचेच तेंव्हा मला कौतुक वाटायचे कारण माझ्या ओळखीत तरी दुसरा कोणी ते करत नव्हता. पण हा म्हणजे कागदाच्या बोळ्यावर कांही बाही लिहून तो एका बाटलीत भरून समुद्रात टाकण्याचा प्रकार होता. ती बाटली कुणाच्या तरी हाती लागली तर लागली आणि त्याला तो बोळा उलगडून वाचावासा वाटला तर वाटला. त्यामुळे नव्याची नवलाई संपताच त्यातील निरर्थकता बोचू लागली.
त्याच कालखंडात मनोगताचा पत्ता सापडला आणि नवा हुरुप आला. रोज उठून या ठिकाणी येणारी आणि फलकावर डकवलेली चिटोरी वाचणारी मंडळी इथे असल्यामुळे आपली चिठोरीसुद्धा कोणी ना कोणी वाचणार आहे याची खात्री पटली. लेख टाकल्या टाकल्या त्याच्या वाचनसंख्येचा आकडा पुढे पुढे सरकू लागायचा. इतके लोक आपले लिखाण वाचतात अशा (गैर)समजुतीने मनाचे समाधान होत असे. ही संख्या फक्त ते पान उघडणाऱ्या क्रियांची असते आणि आपणसुद्धा रोज पंचवीस तीस तरी लेखांची वाचन संख्या अशा प्रकारे वाढवत असतो हे कालांतराने लक्षात आले. हल्ली वाचनसंख्या देण्याची प्रथाच बंद झाली आहे.
सुरुवातीला कोणी "छान","मस्त", असे अभिप्राय प्रतिसादात दिले तर अंगावर मूठभर मांस चढत असे आणि कोणी "भिकार", "टाकाऊ" म्हंटले तर मन थोडे खट्टू होत असे . थोडा अनुभव मिळाल्यावर त्यामागील वस्तुस्थितीचा अंदाज आला आणि 'स्थितप्रज्ञस्य का भाषा' वगैरे श्लोकांचा अर्थ समजायला लागला. मागे वळून पाहतांना या सर्वच अनुभवातून बरेच कांही शिकायला मिळाले एवढे निश्चितपणे वाटते.
वर्षभराच्या अनुभवातून मला काय मिळाले याचा विचार केला तर पहिली गोष्ट म्हणजे थोडेफार शुद्ध मराठी लिहिता येऊ लागले. कांही वाचकांचे प्रेमळ आणि कौतुकाचे शब्द वाचून आत्मविश्वास वाढला. या उद्योगात थोडी स्थिरता आली. एक वर्ष पूर्ण करून आता दुसऱ्या वर्षात प्रवेश करीत आहे हेही नसे थोडके!