शहार!!

शहार!!

मनाच्या मैदानावरल्या
मोहोरलेल्या नंदनवनात
शब्दांचे ताटवे डोकावतायत
फुलून डोलायच्या तयारीत...

वा-याच्या ओंजळीतून
ओसंडत्या सुगंधासोबत
सांडलेले शब्द झेलायला 
कभिन्न कुत्री टपली मोकाट...

केसाळलेल्या शेपट्या सावरत
डोळे लावून हिरवे हावरट
कवितांच्या रोपट्यांकडे
वखवखून लाळ घोटतायत...

लचके तोडायला कधीतरी
सापडतील दातात कोमेजलेल्या
शब्दांची लोंबकळती लक्तरं
समीक्षकाच्या हेकट थाटात...

कवींचा थवा आता शहारलाय
ताटव्यांचं चित्तपण
था-यावर नाही...
शब्दांचे ताटवेच कोमेजतायत!!