इये पुण्याचिये नगरी, महोत्सवांची मांदियाळी
चालले अखंडित, संस्कृती संवर्धन
गावाचा जीव लहान, तरी परंपरा महान
रस्त्यात मांडून ठाण, बैसले मंडप
भगवंत एक, मंडळे अनेक
कार्यकर्त्यांचा सुकाळ, कार्याचा दुष्काळ
गर्दी आवरत नाही, चालणेही त्रास देई
त्यात गणपती केला पार्क, रस्त्यामधे
काय करील जन, घेती जे आले ते पांघरुन
चुकली विचारांची दिशा, शोधती देवळात आशा
टिळकांना ज्याची नावड, आवड त्याचीच विशेष
बेसुमार तालावरती, नाचती रिमिक्स भाई रे
या डोळां पाहिली म्यां, रांग विसर्जनाची
थकलेल्या धार्मिकतेला, जोड बाटलीची
देव बुद्धीचा दाता, विवेक साधावा नेटका
तिथे देखावा वोखटा, कशासाठी?
प्रश्न नव्हे हा संस्कृतीचा, प्रश्न तो समजुतीचा
बुद्धीवर पडो नये, पडदा भक्तीचा
धर्म नसे प्रथेमध्ये, नसेच तो काशीत अन् मक्केमध्ये
धर्म असे आकलन, स्वरुपाचे
एकटे सजग जे चिंतन, जे मांडते ज्ञानाचा पट
दाविते गणिताची उकल, ते प्रमाण
प्राण बुद्धीचे ठायी, सुख-दुःख आपुल्याच पायी
धरोनिया कर्मसूत्र, पुढे जावे
कृष्ण, गणेश अन् दुर्गा, पंढरीचा विठ्ठल बरवा
ओळखावे हे रुप, अरुपाचे
म्हणोनि जे चिंतन, जे आराध्याचे ध्यान
ते असो द्यावे, अंतरात
जे प्रकटावे जनांत, ते जाणिवांचे आर्त
अवघा तो ईश्वर, तोषवावा....