* अजित कुलकर्णी यांची ही कथा एका खाजगी नियतकालिकात पूर्वी प्रसिद्ध झाली होती. ती त्यांच्या परवानगीने 'मनोगत' च्या वाचकांसाठी *
गर्द निळ्या सूटमधे उमदे व्यक्तिमत्व असलेला वसंत हरदास महाविद्यालयाच्या पोर्चमधे उभा होता. अनेक प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या धावपळीकडे तो तटस्थपणे पहात होता. सर्वजण ओळखीचे असल्याने येता जाता त्याला 'विश' करत होते, पण त्याचे तिकडे लक्ष नव्हते. गेली तीन वर्षे जनरल सेक्रेटरी म्हणून वसंत हरदास स्नेहसंमेलनात अग्रभागी तळपत होता, पण नशीबाने त्याला दगा दिला होता!
वास्तविक परीक्षेत बेमालूम कॉपी करण्यात त्याचा हात धरणारा सबंध जिल्ह्यात सापडला नसता. त्या बाबतीतले त्याचे तंत्र अत्यंत निर्दोष होते. त्याच्या उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिकेसहित व्यवस्थितपणे परीक्षाहॉलच्या बाहेर जात आणि वेळ संपण्याअगोदर बरोबर अर्धा तास अचूक उत्तरे लिहून त्याच्यासमोर हजर होत असत. परीक्षाहॉलमधे हरदासचे काम फ़ारच मामुली असे. कोरी उत्तरपत्रिका परीक्षकांकडून घ्यायची आणि मधल्या वेळात टिवल्याबावल्या करून त्याच्या हितचिंतकांनी बाहेर बसून लिहिलेली तीच उत्तरपत्रिका वेळ संपताच शांतपणे परीक्षकांच्या हातात देऊन शीळ घालीत बाहेर पडायचे. कोरी उत्तरपत्रिका बाहेर नेणे आणि लिहून पुन्हा आत आणणे ही यंत्रणा उभारण्यासाठी हरदासने अपरिमित कष्ट घेतले होते. इतके, की हेच कष्ट अभ्यासासाठी घेतले असते तर नक्कीच तो स्वप्रयत्ने प्रथमश्रेणीत उत्तीर्ण होत गेला असता!
कसे कोण जाणे, त्याचे प्रताप प्राचार्य उमरावांच्या कानावर गेले होते. शेवटच्या वर्षी ऐन परीक्षेत त्यांनी छापा घातला होता आणि हरदासला त्याच्याजवळ उत्तरपत्रिका नाही म्हणून वर्गाबाहेर काढले होते. रस्टीकेट करण्याची इच्छा असूनही केवळ पुराव्याअभावी हरदासला फ़क्त परीक्षाहॉलबाहेर काढण्यावरच प्राचार्य उमरावांना समाधान मानावे लागले होते.
हरदास मनातून अतिशय संतापला होता. मुलांसमोर झालेल्या अपमानाने त्याची प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती. रिपीटर म्हणून पुन्हा महाविद्यालयात दाखल झाल्याबरोबर प्राचार्य उमरावांना हरदास ही चीज काय आहे हे दाखवून देण्याचा त्याने निश्चय केला होता. केवळ हजेरी लावायची या उद्देशाने, पण नेहमीप्रमाणे खास सूट घालून स्वारी स्नेहसंमेलनाला आली होती. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. विद्यार्थ्यांबद्दल त्यांना विशेष आपुलकी वाटते असे त्याने ऐकले होते. त्यांना जवळून पहाण्याची इच्छा होतीच, शिवाय उमरावांचा नक्षा उतरवण्याची एखादी नामी संधी उपलब्ध होते की काय हे तो पहाणार होता.
प्राचार्य उमराव घाईघाईने पोर्चमधे आले. त्यांनी मनगटी घड्याळात पाहिले. एव्हाना पाहुणे यायलाच हवे होते असा चेहरा केला. मग स्वागत समितीचे अध्यक्ष दीक्षितांच्या सोबत थोडी कुजबूज केली, रस्त्याकडे दूरवर एकदा निरखून पाहिले आणि पाहुण्यांची गाडी दिसताच कळविण्याची व्यवस्था करून ते आले तसेच घाईघाईने आत निघून गेले.
बाळ्या सामंत सिगारेटचे झुरके मारत आडोशाला उभा होता. त्याला प्राचार्यांची गडबड पाहून गंमत वाटली. त्याचवेळी त्याचे लक्ष हरदासकडे गेले. अख्खे महाविद्यालय सामंतला हरदासची सावली म्हणून ओळखत असे. तो हरदासला म्हणाला, "वश्या, काहीतरी करून या उमरावचा आजच पचका केला पाहिजे!"
हरदासचा चेहरा निवळला. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर प्राचार्यांची फ़जिती होते आहे, त्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे आणि ते वेंधळ्यासारखे हातवारे करताहेत या कल्पनेने हरदासला मनोमन गुदगुल्या झाल्या. बाळ्या सामंत हरदासच्या चेहऱ्यावरचे बदल न्याहाळत होताच! त्याला सुरसुरी आली. त्याने विचारले,"आज मुख्यमंत्र्यांसमोर स्टेजवर उमरावांना गाणे म्हणायला लावायचे! बोल, शंभर रुपये लागले...". हरदासने क्षणभर विचार केला, त्यालाही हिशेब चुकता करायचाच होता. तेवढ्यात त्याला दुरून मुख्यमंत्र्यांची कार येताना दिसली. पोर्चमधे स्वागत समितीच्या सदस्यांची गडबड वाढली. हरदास चपळाईने जागेवरून हलला. तीरासारखा पोर्चमधल्या गर्दीकडे जात तो बाळ्याला म्हणाला, "बाळ्या, संध्याकाळी पैसे तयार ठेव!"
कार सावकाश येऊन पोर्चमधे थांबली. गर्दीतून कशीबशी वाट काढून चेहऱ्यावर अत्यंत नम्रतेचे हसू आणून प्राचार्य उमराव कारजवळ गेले. त्यांनी अदबीने कारचे दार उघडले. उघडलेल्या दारातून पाहुणे बाहेर का आले नाहीत म्हणून ते कारमधे डोकावले आणि संतापाने त्यांच्या अंगाची लाहीलाही झाली. दृष्य राग येण्यासारखेच होते. कारचे पलीकडचे दार उघडून वसंत हरदास बोलत होता आणि आतिथ्याने भारावल्यासारखा चेहरा करून, त्याच्या खांद्यावर एक हात ठेवून मुख्यमंत्री कारच्या बाहेर पडत होते. हरदासने अतिशय सात्त्विक चेहऱ्याने मुख्यमंत्र्यांना नमस्कार केला. मुख्यमंत्र्यांनी त्याचा हात दोन्ही हातात धरून बराच वेळ हस्तांदोलन केले आणि थोडा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी प्रदर्शित केली.
एकाएकी हरदासने दीक्षित सरांच्या हातातला हार घेऊन मुख्यमंत्र्यांना चढवला. त्यांनी सस्मित मुद्रेने हाराचा स्वीकार केला. हरदासची नजर हताशपणे उभे असलेल्या प्राचार्यांकडे गेली. त्यांच्याकडे निर्देश करून हरदास हळूवार आवाजात मुख्यमंत्र्यांना म्हणाला, "हे श्रीयुत उमराव!" आणि दीक्षित सरांकडे वळून त्याने ओळख करून दिली, "हे दीक्षित सर, स्वागत समितीचे अध्यक्ष." तसेच उपप्राचार्य कीर्तनेंकडे निर्देश करून त्याने सांगितले, "हे उपप्राचार्य कीर्तने." मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांकडे वळून नमस्कार केला. उमरावांचा मनातून जळफ़ळाट झाला. या हरदासच्या कार्ट्याने काहीही कारण नसताना अचानक मुख्यमंत्र्यांचा ताबा घेतला होता. निदान ओळख तरी नीट करून द्यायची! नुसते उमराव म्हणजे पाहुण्यांना काही अर्थबोध होईल का? महाविद्यालयाचे प्राचार्य असे नको सांगायला? आता सरळ पाहुण्यांना चहा फ़राळाला न्यावे आणि हरदासची ब्याद त्यांच्यापासून दूर करावी! मग निवांतपणे आपली ओळख पुन:श्च करून द्यावी असा कावेबाज विचार करून उमराव चहा फ़राळाच्या खोलीकडे वळले.
हरदासने धूर्तपणे त्यांचा डाव ओळखला. कोणत्याही परिस्थितीत आता आपण मुख्यमंत्र्यांची संगत सोडता कामा नये हे त्याला जाणवले. निदान हा कार्यक्रम संपेपर्यंत तरी त्यांच्या समवेत रहाण्यातच सुरक्षितता आहे हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची गरज नव्हती! तत्परतेने पुढे होत तो उमरावांना म्हणाला, "हे पहा उमराव, आधीच उशीर झालेला आहे, तेव्हा औपचारिक गोष्टींमधे वेळ न घालवता लगेच स्टेजवरच जाऊ!" संमतीसाठी त्याने मुख्यमंत्र्यांकडे पाहिले. मुख्यमंत्र्यांना त्याची स्पष्टोक्ती आवडली. आजूबाजूच्या गर्दीने ते उबगले होतेच, स्टेजवर जरा निवांतपणा मिळेल असा चाणाक्ष विचार करून ते म्हणाले, "तसेच करू. विद्यार्थ्यांना जास्त वेळ ताटकळत ठेवणेही योग्य नाही." हरदास त्यांना घेऊन स्टेजकडे निघाला.
उमराव रागाने बेभान झाले. त्यांच्या शहाला हरदासने काटशह दिला होता. त्याच्याकडे खाऊ का गिळू अशा नजरेने पहात तेही स्टेजकडे निघाले. हरदासच्या आगाऊपणाने संभ्रमात पडलेला इतर घोळकाही त्यांच्यामागून निघाला.
स्टेजवर फ़क्त तीन खुर्च्या होत्या. हरदासने मधली खुर्ची सरकवून मुख्यमंत्र्यांना बसण्याची विनंती केली. समोरच्या जनसमुदायाला एक छापील नमस्कार करून मुख्यमंत्री स्थानापन्न झाले. लगेच शेजारच्या खुर्चीवर बसकण मारून हरदासने दीक्षित सरांना राहिलेल्या खुर्चीवर बसण्याची सूचना केली. उमरावांकडे भीत भीत पहात दीक्षित सर बसले. विचारांच्या तंद्रीत स्टेजवर आलेल्या उमरावांना बसण्यासाठी खुर्ची दिसली नाही. ते अवघडून उभे राहिले. समोरच्या असंख्य नजरा आपल्यावर केंद्रित झालेल्या दिसताच भांबावले. हरदासने बसल्या जागेवरून आणखी एक खुर्ची स्टेजवर मांडण्याचे फ़र्मान सोडले. कुणीतरी खुर्ची आणली आणि घामाने डबडबलेले प्राचार्य कसेबसे बसले. मुख्यमंत्र्यांनी चमत्कारिक नजरेने त्यांच्याकडे पाहिले. हरदासने दीक्षितांना पाहुण्यांची ओळख करून देण्याची कामगिरी सांगितली आणि मुख्यमंत्र्यांकडे झुकून तो गप्पांमधे दंग झाला.
उमरावांना आता फ़क्त वेड लागण्याचेच बाकी होते. एकदा त्यांना वाटले, पाहुण्यांना खरे सांगून हरदासला सरळ स्टेजवरून हाकलून द्यावे! पण कार्यक्रमाचा विचका होण्याची शक्यता होती. पाहुण्यांनी भरगच्च कार्यक्रमातून कशीबशी तास-दीडतास सवड काढली होती. त्यांच्या वेळेचा अपव्यय झाला असता. हरदासने उमरावांची अवस्था अडकित्त्यात धरलेल्या सुपारीप्रमाणे केली होती. डोक्यात विचारांचा भुंगा झाला होता. स्थळकाळाचे भान हरपून ते शून्यात नजर लावून बसले होते.
गप्पांमधे हरदासने महाविद्यालयाच्या प्रगतीची समग्र माहिती मुख्यमंत्र्यांना ऐकवली. मान डोलावून ती ऐकताना मुख्यमंत्री सारखे उमरावांकडे पहात होते. त्यांनी काहीशा साशंक स्वरात हरदासला विचारले, "हे गृहस्थ कोण?"
"उमराव! मघाशी ओळख करून दिली की..."
"ते समजले हो, पण कॉलेजशी त्यांचा काय संबंध?"
हरदास दीक्षितांच्या भाषणात व्यत्यय न येईल इतपत मोकळेपणाने हसला. हा प्रश्न वास्तविक त्याच्या संदर्भात पाहुण्यांनी उमरावांना विचारावयास हवा होता! त्याने अत्यंत खाजगी आवाजात सांगितले, "ते गायक आहेत, छान गातात!"
"हो का?" मुख्यमंत्र्यांना कौतुकमिश्रीत आश्चर्य वाटले. सूटबूटमधे वावरणारा गायक त्यांनी उभ्या हयातीत पाहिला नव्हता.
"हो, पण त्यांची एक अट आहे!"
"काय?"
"आज तुम्ही त्यांना विनंती केली तरच ते गाणार आहेत."
"का बरे?"
"कारण त्यांनी हल्ली जाहीर कार्यक्रम करणे सोडून दिले आहे." हरदासने ठोकून दिले.
"गृहस्थ भलताच मानी दिसतो!" मुख्यमंत्री उमरावांकडे तिरक्या नजरेने पहात म्हणाले.
तेवढ्यात टाळ्या वाजल्या. दीक्षितांचे बोलून संपले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना चार शब्द सांगायची विनंती केली.
"संस्थेचे चालक, प्राध्यापक वर्ग आणि मित्रहो..." भाषणात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातले मजेशीर अनुभव सांगून श्रोत्यांची चांगलीच करमणूक केली. तेवढ्यात त्यांना उमरावांची आठवण झाली. उमरावही आता भानावर येऊन तल्लीनतेने भाषण ऐकत होते. मुख्यमंत्री म्हणाले, "कितीही झाले तरी गद्य ते गद्य आणि काव्य ते काव्यच! आतापर्यंत माझे भाषण ऐकून तुम्ही कंटाळला असाल...तेव्हा तुमच्याच गावातील प्रसिद्ध गायक श्रीयुत उमराव यांना एक छानसे गीत गाऊन या कार्यक्रमाची सांगता करण्याची मी विनंती करतो! " मुख्यमंत्री आपल्या जागेवर बसले.
'आपल्याला माहीत नसलेले परंतु गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना माहीत असलेले कोण बुवा हे प्रसिद्ध गायक' असा भाव चेहऱ्यावर उमटलेले उमराव स्वतःचे नाव ऐकताच खुर्चीत तीनताड उडाले! सरळ उठून कशाचीही पर्वा न करता हरदासच्या थोबाडात हात दुखेपर्यंत भडकवाव्यात अशी ऊर्मी उफ़ाळून आली. तेवढ्यात मुख्यमंत्री म्हणाले, "उमरावसाहेब, करा सुरूवात!"
उमरावांच्या मानेवर एकाच वेळी घामाचे अनेक उमाळे फ़ुटले आणि त्यांनी वेगाने पाठीवरून धावायला सुरूवात केली. आयुष्यात आजपर्यंत त्यांनी गाणे फ़क्त ऐकले होते. ते म्हणण्याची पाळी आपल्यावर येईल, तेही आपल्याच महाविद्यालयातल्या मुलांसमोर, हे त्यांना स्वप्नातही खरे वाटले नसते. फ़ार वेळ थांबून चालणार नव्हते. मुख्यमंत्र्यांसमोर महाविद्यालयाची अब्रू जाता कामा नये...
उमराव उठून दारूड्यासारख्या झोकांड्या खात माईकपाशी गेले. क्षणभर तोंडातून शब्दच फ़ुटेना. मग ते कसेबसे म्हणाले,
"खरे म्हणजे आज माझा आवाज बसलेला आहे---"
त्यांचे वाक्य अर्ध्यावरच तोडून मुख्यमंत्री म्हणाले, "जमेल तसे म्हणा हो, आपलेच लोक आहेत."
एकंदरीत प्रकाराने आणि हरदासला मुख्यमंत्र्यांसोबत स्टेजवर बसलेले पाहून श्रोतेही चेकाळले होते. त्यातून उमरावांनी गाणे म्हणायची कल्पनाच अफ़लातून होती. मनाचा समतोल राखावा म्हणून उमरावांनी मनातल्या मनात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली, परंतु त्यांच्या नेहमीच्या सवयीने थोड्याच वेळात ती शब्दरूप घेऊन मुखातून बाहेर पडू लागली आणि समोरच्या माइकने चोखपणे तिला श्रोत्यांच्या कानापर्यंत पोचवले.
टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने उमराव भानावर आले. त्यांना आढळले की प्रत्यक्षात आपण रामरक्षा फ़ारच मोठ्या आवाजात म्हणत असून श्रोत्यांनी त्यावर बेभानपणे टाळ्यांचा ठेका धरला आहे! ते भयंकर लाजले आणि पटकन त्यांनी खुर्चीकडे धाव घेतली. मुख्यमंत्रीही टाळ्या वाजवून उठले. हरदास त्यांना घेऊन बोटानिकल गार्डनकडे गेला.
कुणाला मुख्यमंत्री जवळून पहायचे होते, कुणाला हरदास त्यांच्याशी काय बोलतो ते ऐकायचे होते, तर कोणी सगळेजण चालले तर आपणच का मागे रहा असे म्हणत पहाता पहाता बागेच्या फ़ाटकाबाहेर दुतर्फ़ा विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी जमली. हरदास मुख्यमंत्र्यांना बाग दाखवून बाहेर आला तेव्हा बाळ्या सामंत फ़ाटकाशीच पडेल चेहऱ्याने उभा होता. संध्याकाळी शंभर रूपये कुठून जमवायचे या काळजीने त्याचा चेहरा व्यापला होता. त्याला पाहून हरदास सुखावला. हरदासला आठवले, याच बाळ्याला गेल्या वर्षी आपण शब्द टाकूनसुद्धा क्रिकेटच्या टीममधे राखीव खेळाडू म्हणूनही घेतले नव्हते. त्याने बाळ्याला पुढे बोलावले आणि ओळख करून दिली, "हे बाळ सामंत, आमच्या क्रिकेट टीमचे कप्तान!" बाळ्या दचकला, पण मुख्यमंत्र्यांच्या हस्तांदोलनामुळे सुखावला. हरदासबद्दलचा त्याचा आदर द्विगुणित झाला.
इतक्यात गर्दीच्या मागे धपदिशी आवाज झाला. हरदासने पाहिले तर क्रिकेट टीमचा खरा कप्तान सुभाष मोहिते बेशुद्ध होऊन पडला होता. लगबगीने दोन तीन मुले त्याला घेऊन वसतिगृहाकडे गेली.
उमरावांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. 'लेकाचा हरदास पाहुण्यांसमोर आणखी किती वाभाडे काढणार आहे कोणास ठाऊक! ठीक आहे बच्चमजी, पाहुणे जाऊ दे, मग तू आहेस आणि मी आहे! बघून घेईन!' डोक्यात दुसरा विचार नव्हता. तेवढ्यात त्यांना मुख्यमंत्र्यांचे शब्द ऐकू आले, "मला लगेच पणजीला जायचे आहे, रात्री मंत्रिमंडळाची बैठक आहे. मग मी निघू?" हरदासने होकारार्थी मान हलवली. घोळका पोर्चकडे निघाला. जाताजाता उमरावांनी उपप्राचार्य कीर्तनेंना बोलावले आणि पाहुणे जाताच हरदासला आपल्यासमोर हजर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.
मुख्यमंत्री कारमधे बसले. निदान आतातरी त्यांच्याशी दोन शब्द बोलावेत म्हणून उमराव दाराजवळ सरकले आणि रागाने त्यांच्या कपाळाची शीर ताडताड उडू लागली. मुख्यमंत्री पलीकडच्या खिडकीतून हरदासशी हसून बोलत होते आणि त्याला वारंवार गोव्याचे आमंत्रण देत होते. बोलता बोलता हरदास दार उघडून मुख्यमंत्र्यांशेजारी बसला आणि दार बंद केले.
मुख्यमंत्र्यांनी खिडकीतून जमावाला नमस्कार केला आणि कार हलली. मुख्य रस्त्याला लागून तिने वेग घेतला.
रागाने हाताच्या मुठी वळत, दूर जाणाऱ्या कारकडे हताशपणे पहात प्राचार्य उमराव बराच वेळ पोर्चमधे उभे होते.