हरी

चल गं सखी
चल गं सखी ।
चल यमुनेच्या तीरी
वाजे मंजुळ पावरी
भेटेल तिथेच हरी ॥

चल गं सखी...।

पायवाट नागमोडी
गर्द रानात जाई
काटा मोडे पायी
नयनी अश्रू येई
ऱ्हुदयी सावळा हरी ॥

चल गं सखी...।

मयुर पीस डोले
रास हरीचा झुले
भान गोपींचे हरले
बंध वस्त्रांचे सरले
मनमोहन कृष्ण हरी ॥

चल गं सखी...।

यमुनाजळ डहूळे
हुंकार विखारी घुमे
आसावले डोळे ओले
पाहती मूर्त सावळी
तारणहार सखा हरी ॥

चल गं सखी...।

अपमानीत वैदेही
राजस्नुषा मानी
हाक आर्त देई
रक्षी अबला नारी
वासुदेव गोपाळ हरी ॥

चल गं सखी...।

पांचजन्य घुमे
रथचक्र भूवर फिरे
सारथी तो सर्वांचा
पार्थास गीता सांगे
योगेश्वर मुकुंद हरी ॥

चल गं सखी
चल गं सखी ।
चल यमुनेच्या तीरी
वाजे मंजुळ पावरी
भेटेल तिथेच हरी ॥

चल गं सखी...।