...एक माझाही दिवा !

....................................................

नेहमी काळोख ज्यांच्या भोवती...
एकटे, ज्यांना न कोणी सोबती...
फक्त हा त्यांच्याचसाठी...एक माझाही दिवा !

सारखी वाट्यास ज्यांच्या वंचना...
नेहमी ज्यांच्या कपाळी वेदना...
फक्त हा त्यांच्याचसाठी...एक माझाही दिवा !

नेहमी दुःखात अपुल्या चूर जे...
अन् सुखांपासून साऱया दूर जे...
फक्त हा त्यांच्याचसाठी...एक माझाही दिवा !

एक त्यांची आणि माझीही कुळी...
प्रेम ज्यांना लाभले नाही मुळी...
फक्त हा त्यांच्याचसाठी...एक माझाही दिवा !

जाहली ज्यांची उपेक्षा नेहमी
लोक ते आहेत का येथे कमी ?
फक्त हा त्यांच्याचसाठी...एक माझाही दिवा !

दुःख माझे आणि त्यांचे साऱखे...
- जे कुणी मायेस झाले पाऱखे...
फक्त हा त्यांच्याचसाठी...एक माझाही दिवा !

जन्म हा ज्यांचा अमावास्या जणू
का नको मी आपले त्यांना म्हणू ?
फक्त हा त्यांच्याचसाठी...एक माझाही दिवा !

- प्रदीप कुलकर्णी

....................................................
रचनाकाल ः ६ व ७ नोव्हेंबर २००७