कमर्शिअल ब्रेक

तुम्ही विश्रांती घ्यायला निघालात.
जायच्या आधी आम्हाला मात्र
सांगता डोळे वटारुन, बजावून
एक तर्जनी नाचवत, लाडिक धमकी देत
" आम्ही लगेच परत येतोय, ब्रेकनंतर
तुम्ही बसा हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून--
कुठेही जायचं नाही, बरं का ?"

तुम्ही आमची नाडी बरोब्बर पकडलीय:
जाहिरातींच्या वेड्यावाकड्या सरींना
धैर्यानं तोंड देत आम्ही तुमची
वाट बघत बसणार, तुम्हाला माहितीय.....

आता तरी काही  मनासारखं
पहायला- ऐकायला मिळेल ह्या अमर आशेवर,
नकोश्या झालेल्या माणसांसारखे
तुमचे ब्रेक्स सहन करत आम्ही
प्रतीक्षेत आहोत तुमच्या परतण्याची,
वर्गाबाहेर उभं केलेल्या
शाळकरी मुलासारखी !

तुम्ही परत येऊ म्हणताय, या बापडे.
या जाहिरातींमधून जगलो-वाचलो तर,
आपली भेट होईलच लवकर....