कधी....

कधी मंद तेवती ज्योत
कधी धगधगणारी आग
कधी एक जुईचा वेल
कधी घमघमणारी बाग

तरंग थरथरता कधी
कधी चिंब भिजविती लाट
कधी एक स्पर्श चोरटा
कधी जिवाशिवाची भेट

कधी एक पुसटशी तान
कधी लक्ष सूर बरसती
कधी निमिषार्धाची भेट
कधी रात सारी रसवंती

कधी एक हळू निःश्वास
कधी श्वासांची वादळे
लागते समाधी कधी तर
कधी चित्त सदा आंदोळे

हे प्रेम असे अपुले गं
जे कोमेजे नि फुले गं
ह्या अशा दोन टोकांत
आयुष्य सदाच झुले गं