गाव मनातले

खडकलाट..  नसेल ऐकले तुम्ही पण कर्नाटकातले एक छोटेसे खेडेगाव आहे हे.निप्पणीपासून २५ कि.मी असेल.. माझे आजोळ..

आजोळ- किती जिव्हाळा आहे ना ह्या शब्दात... आज अक्का आणि अण्णांना जाऊन १३ वर्षे झाली पण आठवणी तशाच ताज्या आहेत. दर मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही जायचो. खूप खूप मजा करायचो. 

कर्नाटकातल्या एस.टी बसने खडकलाटच्या स्टॅंडवर उतरायचो की स्टॅंडवरचे दृश्य काही असे असायचे- ३-४ माणसे बिडी ओढत बसलेले असायचे, स्टॅंडवरच्या लोकल हॉटेलात ७-८ माणसे असायची. बाकीचे लोक एस.टी मधून उतरणाऱ्या लोकांकडे बघत बसायचे. अण्णांना ओळखत असल्यामुळे काही लोक आपणहून पुढे येऊन सामान उचलायचे.

घरी जाऊन पोहोचताच अक्का धावत पळत यायची.. उंबऱ्याला ठेचकाळत .. हातात भाकरीचा तुकडा आणि तांब्याभर पाणी घेऊन यायची. ती येऊन ओवाळून टाकेपर्यंत आम्हाला धीर निघायचा नाही.अक्का - शांत , प्रेमळ आणि वात्सल्यमूर्ती.. गावात सगळे लोक तिला आक्काताई म्हणायचे. गावातल्या ५ ब्राम्हण घरात आमचे घर अतिशय मानाचे.

माझ्या अण्णांचा जबरदस्त रुबाब होता गावात. अण्णा गावातल्या शाळेचे हेडमास्तर होते. शिकवण्यांसाठी भरपूर मुले यायची त्यांच्याकडे. सोप्यामध्ये बसून शिकवण्या घेताना त्यांचा आवाज खूप घुमायचा. अजूनही तसेच्या तसे दृश्य डोळ्यांसमोर आहे.

खडकलाटेत एक ना मजा असायची- चैत्रातल्या हळदी- कुंकू चा दमदार कार्यक्रम ( डाळीची कोशिंबीर, आंब्याचे पन्हे, हरभरे) .. वा काय मजा यायची म्हणून सांगू. शेवया बनविण्याचाही कार्यक्रम असायचा.म्हणजे १०-१२ बायकांना आमंत्रण जायचे की दुपारी २ ला आमच्याकडे या म्हणून ( मी ही २-३ दा आमंत्रण द्यायला गेले होते ). मग काय सगळ्या जमल्या की कुणाची मुले कुठे आहेत आणि काय काय करतात हे सांगण्यात वेळ जायचा. शेवया हातावर कशा एकसारख्या वळायच्या, मग त्या एका उंच काठीवर वाळत घालायच्या. त्याखाली वर्तमानपत्र ठेवायचे म्हणजे शेवया पडल्या तर त्यावर पडायच्या. शेवया करून झाल्या की चहा-न्याहारीचा बेत असायचा.

अरेच्या... माडीबद्दल कसे काय राहून गेले सांगायचे.माडीवर सांडगे- कुरडया वाळवत घातलेले असायचे. तिथल्या पत्र्यावर जाऊन ते खाण्यात काही औरच मजा यायची. तिथून दुसऱ्यांच्या वाळवणात खडे टाकण्याची जाम मजा यायची. दुपारी लपंडावाचा खेळही मस्त रंगायचा.

मागे हिरवेगार परसदार आणि पुढे ऐसपैस अंगण .परसात अक्काने वेगवेगळी झाडे आणि भाज्या लावल्या होत्या. माझ्या आईने आणि अक्काने मिळून नारळाचे झाड ही लावले होते. अजूनही त्याला नारळ येतात. हे लिहीत असताना एक गाणे हमखास आठवले - " कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला" .

केळीची झाडे (छोटिशी बागच म्हणा हवे तर) , फरसबीच्या शेंगा , टोमॅटो, हिरव्या मिरच्या असे बरेच काही लावले होते. एक वेगळ्या प्रकारचा सुगंध यायचा तिथे.

परसात एक नळ ही होता त्या नळावर गावातल्या आजूबाजूच्या बायका पाणी भरायला यायच्या. एक दिवस आड पाणी यायचे.खूप गोंधळ करायच्या त्या बायका. आम्ही सुट्टीला गेलो की त्या बायका आमच्याकडे बघून अक्काला विचारायच्या की ही तुमची नातवंडे का ? आपण कुणीतरी मोठे आहोत असे वाटायचे. नळावरचे पाणी मोठ्या हौदात भरायला मामा, मामेभावाला आम्ही मदत करायचो. एकदातरी आठवते आहे मला.. [float=font:shital;place:top;]हौदामध्ये साप होता काळाकुट्ट. त्याला बाहेर काढण्यासाठी तर घामच फुटला होता मामाला.[/float] मग त्याला काढल्यानंतर आम्ही लहान मुले तिथे लपून हौदाकडे येणाऱ्या प्रत्येकाला सापासारखा फुस्स फुस्स आवाज काढून घाबरवत होतो.

गावातले अजून बऱ्याच लोकांचे चेहरे आठवतात.. शकुंतला काकू( ह्यांना एस.टी मध्ये चढताना मी चावले होते असे आईने सांगितले .. कारण एस.टी मध्ये चढताना त्यांनी माझ्या पायावर पाय दिला होता ना), मुरली मामा, सिंधू ताई,दादा(शेजारचे), सुभाष मामा.. आहेत काही लोक तिथेच अजून.. आता इथे दिल्लीत आल्यावरही मन अजून तिथेच रमते....

अशा आणि बऱ्याच आठवणी आहेत पण आता थांबवते ...