धुंदावले ते रस्ते
धावत कोण होते?
सोबत कुणिच नाही, ते हात हवेतचं होते
पायांत अडखळलेले अनं थबकलेले होते
पायांस भान आले, ते रस्ते कुठेच नव्हते
काट्यांच्या बरसाती नव्हते फुलवे रस्ते
दरडींच्या खैराती नव्हते हळवे रस्ते
सरसर पाउस होता पण कोरडेच रस्ते
होते कुठे न आता, ते रंगवलेले रस्ते
मखमल पांघरलेले, ते गहिवरलेले रस्ते
त्या गहिवरलेल्या रस्त्यांचे
आभास खरोखर होते
खड्ड्यात पाय पडला
ते रस्ते खरेच होते....
वेणावल्या मनांनी मग भिजलेले रस्ते
रडरडली मग वेडुबाई
खड्ड्यात बुडावे ठरते
खड्ड्यात कुणी खडे ते
अनं हात पसरले होते
स्पर्शूनी मग घेता
ते हात पोळले होते
मलमल नव्हते फसवे
ते हात खरोखर होते.....
हातात हात मग घेता
दुःखच चरले होते
कोण म्हणे ते खड्डे
स्वर्गच उरले होते
हसहसली मग वेडुबाई
काट्यांस खुडावे ठरते
फुलं जुन्या रस्त्याला
जुनीचं अर्पण करते
संदिपले ते रस्ते
धावत कोण होते
सोबत कुणीच नाही
ते हात हवेतचं होते
त्या संदिपल्या रस्त्यांचे
आभास खरोखर होते
खड्ड्यात पाय पडला
ते रस्ते खरेच होते.......!!