तू परत येणार नाहीस हे
मला केव्हाच कळलं आहे
माझं वेड मन मात्र अजून
तसं तुझ्यातच गुंतलं आहे
माझाच मूर्खपणा होता तो
सारं काही गृहीत धरलं मी
डोळे मिटून अंधा~या रात्री
झणी शिडात वारं भरलं मी
कसा दोष तसा देऊ मी तुला
तसं तुझं काहीच चुकलं नाही
पण मी तरी सांग काय करू
पापण्यांवरचं पाणी सुकलं नाही
कशीही होवो तशी माझी अवस्था
तुझंच भलं असेल मनात माझ्या
हसेन मी इथे लपवून आसवाना
जखमा असतील जरी मनात ताज्या
जगाच्या पाठीवर, कुठेही राहा तू
फुलू दे गुलमोहर तुझ्या अंगणीचा
पडतील जिथे जिथे पाउले तुझी,
असो हळूवार मखमलि गालीचा