मी सोंगामागुन सोंगे वठवित जाते
हा वेळ कुठे संपला जाणवत नाही
या खांद्यावरची फक्त बदलती ओझी
आजकाल माझा दिवसच संपत नाही ॥
ही शर्यत कसली? काय ध्येय मी गाठू?
शेवटी मिळावे श्रेय/प्रेय वा हाती?
का पुरुषार्थांची केवळ शाब्दिक स्वप्ने?
का यावे माझे वैफल्यच सांगाती?
धन मिळते तेंव्हा वेळ मिळेना कोठे
तो मिळता सगळे वय उलटुनिया जाई
ज्या पकडाया धावलो आंधळ्या वाटा
ते अंतर होई कमी तसूने नाही
दो दिडक्यांसाठी स्वाभिमान हा विकुनी
हे रोज चालले नाट्य जगाच्या मंची
मेंढरे होउनी वाट पुढे चालावी
का हीच आमुच्या कर्तृत्त्वाची उंची?