काय वेगळा श्रुंगार कुणाचा
प्रेम असो वा व्यवहार कुणाचा
ये न ओळखू खोटे-खरे जगी
सत्य झाकतो अंधार कुणाचा
तू पतिव्रता अन् एकनिष्ठ तो
आज वेगळा चित्कार कुणाचा
ही न आकळे, नीती मला मुळी
प्रीत कुणाशी, संसार कुणाचा
रात्र जागवू, निर्धास्त ये सखे
कोण पाहतो व्यभिचार कुणाचा
राम सावळा, घनश्याम सावळा
गौरकाय हा अवतार कुणाचा
तीच भाषणे, अन् त्याच घोषणा
दंभभारला सत्कार कुणाचा
जून कालचे झाले गळे अता
हा नवा नवा गंधार कुणाचा