किती एक दिसांचं साचलेलं
जरा पहावं म्हणत होतो.
एकदा मांडलेला डाव पुन्हा मांडताना
काही रोकडे हिशेब हे आलेच ...
जगासमोर जाताना शेखी मिरवली काय
वा कोड्यात वागलं काय
स्वत: स्वत:शी चोरी थोडीच करता येते?
आपल्यांसमोर, अगदी आतल्यांसाठीही
हसतमुखाला बोलवायचं
अवघडशा मुद्यांना सराईतपणे टोलवायचं
हे सगळं जमलं तरी
- झेपेलच याची खात्री थोडीच देता येते?
आणि त्यातही एखाद्या मोक्याच्या क्षणी
तंद्रीतल्या शहाऱ्याची शिरशिरी
अंगभर थोडीच थोपवता येते?
जाऊ द्या,
लोकांचं ते एक जरी सोडलं तरी
आणि या बोचणीचा उगम शोधायचा राहू दिला तरी
गमक तर समजायला हवं ना!
अकर्मण्यतेचं वैषम्य 'आज' वाटावं
इतकं काही आपलं अतीत उज्ज्वल नाही.
कपोलकल्पित पापांचा धनी
स्वत:च स्वत:ला तरी धरता येत नाही.
मग आता उगम राहो नि ते गमकही राहो
काहीतरी म्हटलं तर पाहिजे.
काय बरं म्हणावं हिला
अपूर्णाची खंत
की अमूर्ताची हुरहूर? ...
- दायशान्, चीन
२१ जानेवारी २००८