वादळभूमी १.०

 मग मी परत एकदा विमानातून खाली बघितलं. तसाच सपाट विस्तीर्ण पसरलेला वैराण प्रदेश! पण निदान तो ओळखता तरी येत होता. मुंबईहून भल्या पहाटे विमान निघालं तेव्हा तर किती वेळ पाणी आहे की ढग आहेत की जमीन आहे, हे काहीच कळत नव्हतं. कानांना बसलेले दडे काढायचं तर मी बंद केलं होतं. तसं कानांना दडे वगैरे बसतात हे ऐकलं होतं पण एवढे आयुष्यभराचे दडे बसतील हे काय माहीत? मला नक्कीच कंटाळा आला होता. पण करणार काय? एकतर नेहमी अशी कुठे प्रवासाला सुरुवात करताना एक वेगळीच विलक्षण अवस्था झालेली असते. झोप वगैरे काही येत नाही. एखाद्या लहान मुलाला नवीन खेळणं मिळाल्यावर होते त्या अवस्थेत आपण सगळं बघत असतो. त्यामुळे या पहिल्या विमानप्रवासात सगळे सोपस्कार उरकून बसल्यावर काय करावं हे मला बिलकूल माहित नव्हतं.

 तरी त्यातल्या त्यात सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे 'विजय मल्ल्या' आमच्याच विमानात होते. त्यांच्या 'नेहमीच्या घोळक्यात' ते बसले होते. मग पुढे काय? तर ते माझ्याकडे बघून हसत होते. मग मी पण त्यांच्याकडे बघून हसलो! आता या पुढची पायरी म्हणून हस्तांदोलन करायला हवं!  मी हात पुढे केला. पण एक नाही की दोन नाही!  बराच वेळ झाला. मला हा असला शिष्टपणा बिलकूल आवडत नाही. एकतर हा खिडकीतून दिसणारा वैराण प्रदेश बघून मी हैराण झालो होतो. पण जाउदे!  त्यांची तरी काय चूक आहे? 'छापील' माणसाकडून अजून कसली अपेक्षा करणार?  कंटाळून मी ते मासिकही परत ठेऊन दिलं. आणि परत खिडकीतून बाहेर बघायला सुरुवात केली. हळूहळू माहोल बदललेला दिसायला लागला. एखादा दुसरा पाण्याचा कालवा, शेतं वगैरे दिसायला लागली. मध्येच एखाद्या घराचा पत्रा उन्हात चमकून जाई. आस्ते आस्ते इमारती, बंगल्यांच्या सोसायट्या, कामधंद्याला निघालेल्या मनुष्याकृती दिसायला लागल्या तशी विमानात हालचाल सुरु झाली.

म्हाताऱ्याकोताऱ्यांमध्ये गडबड सुरु झाली. कदाचित लवकर उतरलं नाही तर पुढे कोलकात्याला जावं लागेल असं त्यांना वाटत असावं!  जमीन जवळ येत चालली, विमानाने दोनचार गिरक्या घेतल्या आणि  एवढा वेळ हवेत असलेलो आम्ही जमिनीवर आलो, विमानतळावर उतरलो! सकाळच्या सोनेरी उबदार  किरणांमध्ये तो छोटासा नीटनेटका विमानतळ न्हाऊन निघाला होता. सकाळचे साडेसात वाजले होते.