सौंदर्य

मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात तू रोजच दिसतोस
मी भेटले की, संभ्रमात, अवघडलेलं हसतोस.

माझी हुशारी, बोलणं-वागणं   तुला भावलेलं दिसतंय,
त्याचं कौतुक तुझ्या डोळ्यांत तुझ्या नकळत हसतंय !

पण.....मी दिसायला सामान्य आणि मलाही आहे मान्य
सर्वमान्य हे सत्य, की सौंदर्य तेच, जे डोळ्यांना दिसतं !

माझ्यातली ती अदृष्य सुंदरी जी तुला खुणावतेय ना,
तिच्या दृष्य रुपातली उणीव तुला अस्वस्थ करतेय, ना ?

असल्या नकारांची आताशा सवय होऊ लागलीय मला,
खरंच, पण असं का व्हावं कधीच कळणार नाही मला !

आतून आपल्या सौंदर्याला नित्य उधाण येत रहावं,
अन किनार्यावरच्या जगाच्या..... ते गावीही नसावं ?

कधीतरी वाटून जातं - भरतीच्या समुद्रासारखं , वहावं
ते ओसंडून बाहेर , अन अलगद सर्वांगावर पसरावं...

फार नाही, निदान इतपत तरी, की कधीतरी,
...... तुझ्यासुद्धा डोळ्यांना ते दिसावं !