संसार माझा

संसार माझा

तोः नाजूक मुली तू, नादावलेल्या, वरशी मला, करशील का, संसार माझा? |
तीः राकट मुला तू, छांदिष्ट कुठला, हो म्हण मला, कर साजरा, संसार माझा  || धृ ||

तो:
जगणे न असते, सहज सोपे, ह्या इथे, हा लढा हे, जाणूनी घे |
पळ पळ परीक्षा, होत असते, ह्या इथे, ती सहजच, समजूनी घे |
लढ्यातून निभावलीस तर, चालेल मलाही, वरशी मला, करशील का, संसार माझा || १ ||

ती:
भवती तुझ्या, तू संग असता, काय वर्णू सदाची, भाव माझे |
कसला लढा, अन् परीक्षाही, मुळी न अवघड जाणवे, सोपी वाटे |
तू फक्त हो म्हण, मग बहारच की सारी, हो म्हण मला, कर साजरा, संसार माझा  || २ ||

तो:
हैराण होशील, आमदनीतून, कुटुंबाचा, वाढता, खर्च करता |
संत्रस्त होशील, सकाळी सकाळी, तू नळाचे, पाणी भरता |
त्यातही न थकलीस तर, प्रेमही करूया, वरशी मला, करशील का, संसार माझा? || ३ ||

ती:
जे तू कमावशील, तेच पुरवू, संसाराला, प्रगतीला, कुटुंबाच्या  |
मी नाही थकणार, रे कधीही, काम घरचे, कितीही, करता करता |
हुरूप राखू या अन्, प्रेमही करूया, हो म्हण मला, कर साजरा, संसार माझा  || ४ ||

- नरेंद्र गोळे २००८०३११

ही कविता मौलिक आहे.
कुठल्याशा हिंदी गाण्याच्या चालीवर म्हणता येत असली तर तो काही कवितेचा दोष ठरत नाही.