जाऊ दे ना गं मला साळंला,
आई, जाव दे ना गं मला साळंला ।।
सकाळधरून तू बेगिनं आवरुन, निघुन गेलीस कामाला,
वेणीफणी करुन नि इनिफाम घालून, बघतेय तुज्या वाटंला,
कधी तू येशिल, नि कधी मी जाईन, उशीरच होऊन गेला,
शाळेला वेळेवर जान्याचा धडा, मी पहिल्याच दिवशी चुकविला ।।
वेणीफणी करुन....
भांडीकुंडी सारी,बग घासुन-पुसून मी ठेवून दिलित जागेला,
कपडे बी सगळे धुवूनशान आन् लावून दिलेत दांडीला,
हीरीचं पाणी वढूनशान मी हंडा बी भरून ठेवला,
झाडलोट करुन, नि रांगोळी रेखून, पाणी बी घातलं तुळशीला ।।
वेणीफणी करुन....
संभाळल्या बाळाच्या दुदाच्या वेळा, नि न्हाऊ बी घातलंय त्येला,
बनवला नाश्टा दादासाठी आन्, बाबाला च्या बी क्येला,
होत्या त्या पिठाच्या चार-पाच भाकरी नि झुनका बी करून ठेवला,
नि कालचीच भाकरी नि गुळाचा खडा, मी घेतलाय मधल्या सुट्टीला ।।
वेणीफणी करुन....
माजी शाळेला जायची गडबड बगून, बग बाबा बी वरडायला लागला,
म्हणे, घरातली कामं करायची कुनी, नि संभाळंल कोन पोरान्ला,
लई जाले शिक्शान,नि लई जाली साळा, आता उजवूनच टाकतो तुला,
आई, करीन ग सगळी घरातली कामं, पन शाळा न्हाई सोडायची मजला ।।
वेणीफणी करुन....
जवा दारू पिऊन बाबा येतो घरी,तवा लई भ्याव वाटतंय मजला,
कसं ग करशील, कसं संभाळशील, तुजी काळजी बी वाटतीया मजला,
चंदू, बाळा,दोगे लाहान आजून,आन् चालू हाय दादाची शाळा,
ठेव भरवसा ग, आई, शिकीव मला, होईन तुज्या ग आधाराला ।।
वेणीफणी करुन....
माये, आई तुजी आन् सासू तुजी, कशा शेतकामाने झिजल्या,
आन् तुजा बी जीव, शिक्शानाच्या विना,आये घरकामाने पिचला,
घाईघाईने लगिन, नको मला, आई, साळेत जाऊ दे मजला,
शिकून-सवरून,मोठी शाणी होऊन,बग मिळवीन सन्मानाला ।।
वेणीफणी करुन....