काटेरी

वैराण वाळवंटात रुजलं
ना पावसाचा आल्हाददायक शिडकावा
ना दवाचा शीतल स्पर्श
खोल पाठवावी लागली त्यास मुळं
तापट वाळूत
जीवनाच्या दुर्मिळ थेंबांच्या अटळ शोधार्थ

उन्हातान्हाचा दैनिक ताप
वारे कोरडे, उष्ण, शोषक
वादळंही आकस्मिक वाळूची

या साऱ्यांशी झुंजत ते वाढलं
चिवटपणे
त्वचा (आणि मन) घट्ट करून
काट्यांची वाघनखं काढून
येणाऱ्या-जाणाऱ्याला बोचकारणारी
रक्त काढणारी...
आप-पराची तमा न बाळगता

तीच ठरली त्याची ओळख
काटेरी, एकलकोंडा, माणूसघाणा...

निवडुंगाची फुलं कोण पाहतो?