"हाच प्रश्न तु मला
पुन्हा एकदा उद्या विचार
जेव्हा आजची ही मोहाची
रात्र सरली असेल
मधे एक दिवस गेला असेल
आणी तुझ्या भावनांना
विचार करायला वाव मिळाला असेल"
"भेट तिथं त्या प्राजक्ताखाली
आणि येणार नसशील तर
एक मेसेज कर
कळेल मला मग
आजच्या या क्षणिक मोहानं
तुला असं विचारायला भाग पाडलं"
"आणि आलास तर
प्राजक्त फुलला असेल...फक्त तुझ्याचसाठी..."
रात्रभर आणि दिवसभर
मी प्रार्थना करत होते
मोबाईल वाजू नये मेसेज साठी
दुसऱ्या रात्री पर्यंत
पण तो वाजला!
तरीही...तरीही...
मी त्या जागेवर गेले होते
त्या जागेवर मी गेले होते
भावनांना विचारांचा किनारा
का मिळाला नाही हे विचारायला
एका दिवसाचा अवधी दिला
हि चुक केली का
हे विचारायला, त्या प्राजक्ताला...
पण माझ्या आधी तिथं
तो प्राजक्तच रडत होता
कारण त्यालाही कळलं होतं
सडा वेचायला आता कुणीच येणार नव्हतं!