पारिजात...

गाढ साखरझोपेत,

वार्‍याच्‍या झुळकेबरोबर,

मोहक सुगंधाची चाहूल लागली..

सुगंधाचा मागोवा घेत,

बाहेर अंगणात येऊन पाहिले तर,

शुभ्र, रेशमी शाल पांघरून,

पारिजात ध्‍यानस्‍थ बसलेला....

त्‍याच गंधलहरींवर झोके घेत,

परत निद्रावश झाले; 

जणू सुखस्‍वप्‍न पाहिले....

सकाळी जाग आल्‍यावर,

प्रथम पारिजात आठवला..

अंगणात जाऊन पाहिले तर,

शुभ्र, रेशमी शाल, ओघळलेली....

सुगंध, सार्‍या वातावरणात विरघळलेला; 

आणि पारिजात,

तसाच ध्‍यानस्‍थ बसलेला....

बाकी, फक्‍त निर्माल्‍य आणि पाचोळा....

सुख आणि दु:ख,

दोन्‍ही, फक्‍त मला?....