स्वप्नाच्या गोड चंदेरी दुनियेत
चांदणे शिंपडत येशील का ?
तुझी सावली ही माझी असावी
इतकी माझी होशील का ?
श्रावणाची सर सुखद कधी
रिमझिम बरसत येशील का ?
डोळ्यातल्या धुंद प्रेमात तुझ्या
मला सामावून घेशील का?
सप्तरंगी इंद्रधनूत
प्रेमाचा रंग भरशील का ?
उमलते गुलाब डोक्यात कधी
आठवून मला खोवशील का ?
शब्द मनातले मांडून कधी
आठवणीतली कविता रचशील का ?
गालावरती सुंदर हसू
खुदकन हाक मारशील का ?
पापण्यांच्याही नकळत कधी
अश्रूंना अलगद टिपशील का ?
हृदय स्पंदन मोजून आपल्या
रेशिमगाठी जुळतील का ?
सप्तसुरांचा मधुर नाद
कृष्ण बासरी वाजशील का ?
किनारी वाळूच्या घरट्यात हळूच
सागर लाट शिरशील का ?
वाट बघत पहिल्या पावसाचा
टपोरा थेंब झेलशील का ?
सकाळच्या धुक्यात प्राजक्त सडा
परडीत हळूच झेलशील का ?
सुख आणि दुःखं प्रत्येक क्षणी
साथ नेहमी देशील का ?
तुझी सावली ही माझी असावी
इतकी माझी होशील का ?